प्रो- कबड्डी – कोण गाठणार आज अंतिम फेरी! पटना-यूपी अन् दिल्ली-बंगळुरू उपांत्य फेरीत भिडणार

प्रो-कबड्डी लीगचा आठवा हंगाम आता अंतिम टप्प्यावर आलाय. उद्या बुधवारी पटना पायरेट्स आणि यूपी योद्धा यांच्यात पहिली उपांत्य लढत रंगणार आहे. दुसऱया उपांत्य लढतीत दबंग दिल्ली व बंगळुरू बुल्स एकमेकांना भिडणार आहेत. पटना आणि दिल्ली या संघांनी साखळी फेरीत अनुक्रमे पहिले दोन क्रमांक पटकावत उपांत्य फेरी गाठली होती. दुसरीकडे यूपी योद्धाने पहिल्या एलिमिनेटर लढतीत पुणेरी पलटणला, तर बंगळुरू बुल्सने दुसऱया एलिमिनेटर लढतीत गुजरात फॉर्च्युन जायंट्सला हरवून उपांत्य फेरी गाठली. त्यामुळे कोणते दोन संघ अंतिम फेरी गाठणार यासाठी कबड्डी शौकिनांमधील उत्सुकता टिपेला पोहोचली आहे.

पटना पायरेट्स आणि बंगळुरू बुल्स यांनी प्रो-कबड्डीचे विजेतेपद पटकावलेले आहे, मात्र दबंग दिल्ली आणि यूपी योद्धा या संघांना अद्याप जेतेपद मिळालेले नाही. पटनाने तिसऱया, चौथ्या आणि पाचव्या लीगचे विजेतेपद पटकावून हॅटट्रिकचा पराक्रम केलेला आहे. बंगळुरूने सहाव्या हंगामात बाजी मारली होती. दबंग दिल्लीला गतवेळी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आता सलग दुसऱयांदा अंतिम फेरी गाठण्यासाठी त्यांच्या मार्गात बंगळुरू बुल्सचा अडथळा असेल.

पटना पायरेट्सने साखळी फेरीत 22 पैकी 16 लढती जिंकल्या असून केवळ 5 लढती गमावल्या. त्यांची एक लढत बरोबरीत सुटली होती. यूपी योद्धाने 22 पैकी 10 लढती जिंकलेल्या आहेत. मात्र पुणेरी पलटणविरुद्धच्या लढतीत त्यांच्या स्टार रेडर प्रदीप नरवालने चौफेर चढाया करीत 18 गुणांची कमाई केली होती. त्यामुळे आपल्या आधीच्या पटना पायरेट्सच्या मार्गात उपांत्य लढतीत यूपी योद्धाच्या प्रदीपचा मोठा अडथळा असेल. प्रदीप फॉर्मात आल्याने पटनासाठी उद्याची लढत नक्कीच सोपी नसेल. प्रो-कबड्डीच्या इतिहासात उभय संघ 10 वेळा आमने सामने आले असून त्यात यूपी योद्धाने 4 वेळा, तर पटना पायरेट्सने 5 वेळा बाजी मारलेली आहे. यंदाच्या हंगामातही दोन्ही संघांनी एकमेकांना एकेकदा हरवलेले आहे. दबंग दिल्ली आणि बंगळुरू बुल्स यांच्यातील दुसरी उपांत्य लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. उभय संघांत प्रो-कबड्डीच्या इतिहासात 16 लढती झाल्या आहेत. यात बंगळुरूने 6 वेळा, तर दिल्लीने 8 वेळा बाजी मारलेली आहे.

आजच्या उपांत्य लढती

पटना पायरेट्स वि. यूपी योद्धा (रात्री – 7.30 वाजता)

दबंग दिल्ली वि. बंगळुरू बुल्स (रात्री – 8.30 वाजता)