‘बेस्ट’ने प्रवाशांच्या सुविधेसाठी ऑनलाइन तिकीट सुविधेमध्ये ‘चलो अॅप’ कार्ड सुरू केले असले तरी सद्यस्थितीत ‘चलो अॅप’ कार्डच्या तुटवडय़ामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पालिकेच्या ऑनलाइन सुविधेला फटका बसत आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करून सुविधा पूर्ववत करावी, अशी मागणी प्रवाशांमधून करण्यात येत आहे.
‘बेस्ट’ प्रवासामध्ये तिकिटासाठी लागणाऱया सुट्टय़ा पैशामुळे नेहमीच कटकट होत असल्यामुळे प्रशासनाने ‘चलो अॅप’ सुविधा सुरू केली. हजारो प्रवाशांनी हे अॅप डाऊनलोड करून सुविधेचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र सद्यस्थितीत या कार्डच्या तुटवडय़ामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बेस्टच्या वाहकांकडे प्रवाशांकडून कार्डची मागणी केली जाते, मात्र कार्ड उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. वाहनांनादेखील प्रत्येक कार्ड विक्री केल्याने 50 रुपये मिळत होते. आता ही रक्कम मिळणेदेखील बंद झाले आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
प्रशासन म्हणते…
‘चलो अॅप’ कार्ड नसल्याने प्रवाशांना प्रवास रद्द करण्याच्या घटना अद्याप घडलेल्या नाही. शिवाय ‘चलो अॅप’ कार्ड लवकरच आवश्यक प्रमाणात उपलब्ध करण्यात येतील, अशी माहिती प्रशासनाने माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे. याबाबत प्रवासी विहार दुर्वे यांनी बेस्टकडे माहिती अधिकारात माहिती मागितली होती.