वीजनिर्मिती झाली स्वस्त; ग्राहकांवरील 1250 कोटींचा भार हलका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
electricity-1

सामना प्रतिनिधी । मुंबई

महावितरणच्या वीज दरवाढीची कोटीच्या कोटी उड्डाणे सुरू असतानाच महानिर्मितीने मात्र वीजनिर्मिती खर्च कमी केला आहे. याआधीच्या वीज दराच्या तुलनेत प्रतियुनिटमागे सात पैशांनी महानिर्मितीची वीज स्वस्त झाली आहे. सात पैसे हा आकडा किरकोळ वाटत असला तरी तब्बल 1250 कोटी रुपयांचा ग्राहकांवरील आर्थिक भार हलका होणार आहे. महानिर्मिती महावितरणला वर्षाला सुमारे 50-60 दशलक्ष युनिट विजेचा पुरवठा करते. यात सर्वाधिक कोळशावरील विजेचा समावेश असल्याने मागील वर्षी महानिर्मितीच्या प्रतियुनिटचा सरासरी 3 रुपये 77 पैसे एवढा दर होता. या दरात कपात करण्यासाठी महानिर्मितीने कोळसा पुरवठय़ात लवचिकता आणून प्रकल्प परिसरातील खाणींमध्ये निघणारा कोळसा वाहतुकीच्या दृष्टीने स्वस्त पडेल असा पुरवला आहे. त्यामुळे कोळसा वाहतुकीवरील खर्च कमी झाल्याने आणि वीज प्रकल्पांची कार्यक्षमता वाढल्याने एकूण खर्चात घट झाली आहे. त्याची दखल घेत वीज नियामक आयोगाने महानिर्मितीच्या प्रतियुनिट विजेचा दर 3 रुपये 77 पैशांवरून 3 रुपये 70 पैशांपर्यंत खाली आणला आहे.