शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न म्हणजे जुने बुरसटलेले विचार व वर्णभेदाला पुरस्पृत करण्याचा प्रकार आहे. राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा (एससीईआरटी)ने जाहीर केला आहे. यात मनुस्मृतीचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या निरागस मनावर मनूची विभाजनवादी मूल्ये लादण्याच्या डाव असून काँग्रेसचा याला तीव्र विरोध आहे. अभ्यासक्रम आराखडय़ातून हा आक्षेपार्ह भाग काढून टाकावा नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा शालेय शिक्षण आराखडा ‘एससीईआरटी’ने जाहीर केला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवल्या आहेत. यावर प्रा. वर्षा गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, ज्या मनुस्मृतीमुळे वर्णव्यवस्था निर्माण केली आणि ज्या मनुस्मृतीला महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातांनी जाळले त्याच मनुस्मृतीचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करायचा का, असा संतप्त सवाल वर्षा गायकवाड यांनी केला.