मंगळसूत्र चोराला पाठलाग करून पकडले, व्यावसायिकाची धाडसी कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वडाळय़ाच्या आंध्र एज्युकेशन सोसायटी शाळेतील शिक्षिका नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी शाळेवर निघाल्या होत्या. शाळेपासून काही अंतरावर त्या आल्या असताना अचानक त्यांच्या गळय़ातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून एक तरुण पळू लागला. त्या चोर चोर ओरडू लागल्या. पण तेव्हा रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. तेवढय़ात तेथून मुलाला शाळेत सोडायला निघालेल्या दुचाकीस्वाराने शिक्षिकेची ओरड ऐकली आणि क्षणाचाही विचार न करता पाठलाग करून त्या चोरावर झडप घातली.

जीटीबी नगर येथील म्हाडा कॉलनीत राहणारे व्यावसायिक रफिक शेख हे त्यांच्या मुलाला आरएके मार्ग चार रस्ता येथे असलेल्या शाळेत सोडायला गेले होते. मंगळवारी सकाळी सातची वेळ होती. त्याचवेळी आंध्र एज्युकेशन सोसायटी येथे शिक्षिका असलेल्या प्रतिभा नगम (39) या शाळेच्या दिशेने कामावर जात होत्या. शाळेपासून काही अंतरावर प्रतिभा आल्या असताना त्यांच्या गळय़ातील मंगळसूत्र हिसकावून एक तरुण पळू लागला. आपल्यासोबत काय झाल हे काही क्षण प्रतिभा यांना समजलेच नाही. पण गळय़ातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याचे समजताच त्यांनी चोर चोर अशी ओरड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तेथून जाणाऱया रफिक यांच्या कानावर ही ओरड पडली. रफिक यांनी त्याकडे दुर्लक्ष न करता एका जबाबदार नागरिकाचे कर्तव्य बजावण्याला महत्त्व दिले. रफिक यांनी स्वतः पाठलाग करून अलामिन मुबारक शेख (36) या सोनसाखळी चोरावर झडप घातली. न घाबरता रफिक यानी ऍण्टॉप हिलच्या बंगालीपुरा येथे राहणाऱया अलामिन या चोराला  पकडून माटुंगा पोलिसांच्या स्वाधीन केले. परिमंडळ-4 चे उपायुक्त संजय पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी रफिक यांच्या धाडसी कामगिरीचे कौतुक करीत त्यांचा सत्कार केला.