
मराठी चित्रपटगीतं, नाट्यपदं, अभंग, गजल, भावगीतं, समूहगीतं, लोकगीतं, युगुलगीतं अशा संगीताच्या अनेक क्षेत्रांत आपला अमीट ठसा उमटवणारे प्रतिभासंपन्न संगीतकार यशवंत देव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ‘शतदा प्रेम करावे’ हा त्यांच्या आयुष्याचा प्रवास उलगडणारा कार्यक्रम 1 नोव्हेंबर रोजी सावरकर सभागृह, शिवाजी पार्क येथे सायंकाळी 7.30 वाजता विनामूल्य आयोजित करण्यात आला आहे.
याविषयी कार्यक्रमाचे आयोजक आणि संवादक अतुल अरुण दाते सांगतात, जगभरात पेण हे शहर गणपतीसाठी प्रसिद्ध आहे, पण आम्हा संगीतात रमणार्या माणसांसाठी पेणची ओळख यशवंत देवांमुळे आहे. कारण देवसाहेब स्वतः पेणचे. मराठी संगीतातल्या प्रत्येक रसिकांनी पेणचे गणपती घरी आणले नसतील, पण यशवंत देवांची गाणी घरोघरी पोहोचवली. त्यांच्या गाण्यानेच आपल्या संगीतावर शतदा प्रेम करायला शिकवले. अशा संगीताच्या देवाला मानाचा मुजरा म्हणून रसिकांसाठी ‘शतदा प्रेम करावे’ हा कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत.
माणिक एन्टरटेन्मेंट निर्मित आणि अतुल अरुण दाते प्रस्तुत या कार्यक्रमात नवा शुक्रतारामुळे नावारूपाला आलेले गायक मंदार आपटे, श्रीरंग भावे आणि विद्या करळगीकर या गायकांचा सहभाग आहे. तसेच अतुल दाते आणि सुप्रसिद्ध निवेदिका दीपाली केळकर यावेळी रसिकांशी संवाद साधणार आहेत.
संगीताच्या ‘देवा’चा प्रवास उलगडणार
शेकडो गीतांना संगीतसाज चढवणार्या या प्रतिभावान संगीतकाराची जडणघडण, त्यांच्यावरचे सांगीतिक संस्कार, त्यांच्या आयुष्याची वाटचाल याविषयी रसिकांमध्ये उत्सुकता आणि कुतूहल असतेच. शिवाय ‘स्वर आले दुरूनी’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’, ‘माझ्या प्रीतीच्या पाखरा’, ‘जीवनात ही घडी’, ‘आज राणी पूर्वीची ती’, ‘या जन्मावर’, ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘डोळे कशासाठी’ अशा एकापेक्षा एक कैक अनोख्या गाण्यांचा नजराणा त्यांनी रसिकांना बहाल केला आहे. या गाण्यांविषयीच्या आठवणींसह त्यांच्या आयुष्याचा प्रवासही यावेळी उलगडला जाईल.




























































