
गेल्या 22 वर्षांपूर्वी राधानगरी तालुक्यातील केळोशी बुद्रूक येथील धरणासाठी 47 शेतकऱयांची शेती संपादित करण्यात आली. ‘बैलगोंड’ ओढय़ावर 5603 सहस्र घनमीटर साठवण क्षमतेचा लोंढा-नाला प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून या प्रकल्पात पाणी अडवून त्याचा गावकऱयांनी शेतीसाठी वापर करायला सुरुवात केल्याने परिसरात हरितक्रांती झाली. प्रकल्पामुळे 503 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. पण ज्यांची जमीन या प्रकल्पात गेली, त्या 47 प्रकल्पग्रस्तांचे अद्यापि पुनर्वसन न झाल्याने संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी आज केळोशी धरणातील पाणी नदीपात्रात सोडून गेटला टाळे ठोकले.
दोन महिन्यांपूर्वी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात कोल्हापूर पद्धतीच्या 19 गेटेड बंधाऱयाचा शुभारंभास आमदार आबिटकर यांच्या उपस्थितीत झाला. पुनर्वसन केल्याशिवाय शुभारंभ करू देणार नाही, असा आग्रह प्रकल्पग्रस्तांनी धरला होता. महसूल प्रशासनाकडे सोपस्कार पूर्ण करूनही त्याची दखल घेतली जात नाही. प्रशासन चालढकल करत आहे, असा आरोप केला होता. त्यावेळी जातीने लक्ष घालतो, असे आबिटकर यांनी सांगितले. मात्र, कामात अपेक्षित गती न मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांनी निवेदनाद्वारे इशारा दिला होता, त्यामुळे संतप्त प्रकल्पग्रस्तांनी आज केळोशी धरणातील पाणी नदीपात्रात सोडले व गेटला टाळे ठोकले.
आंदोलनस्थळी झालेल्या प्रकल्पग्रस्त व प्रशासनाच्या बैठकीत संकलन नोंद व पुनर्वसनाबाबतीत दहा दिवसांत कार्यवाही करण्याचे ठरले. सर्व समस्या लवकरच पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन देण्यात आले. यावेळी महसूलचे अव्वल कारकून प्रदीप शिंदे, उपअभियंता यू. आर. स्वामी, शाखा अभियंता रावसाहेब गाडे, सर्कल राजकुमार कोरे, तलाठी रणजित पाटील, पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड, उपनिरीक्षक अनुराधा पाटील, कृष्णात यादव, केरबा पाटील उपस्थित होते.





























































