
पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय 7 मे रोजीचा शासन निर्णय जारी करून राज्य सरकारने घेतला. मात्र या निर्णयाचे पडसाद आज यासंदर्भातील उपसमितीच्या बैठकीत उमटले. या बैठकीनंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी थेट प्रेस नोट काढून या निर्णयावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनावले असा उल्लेख करतानाच हा निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून निर्णय रद्द केल्याबाबत कोणतेही संकेत न दिल्याने अखेर आधीची प्रेस नोट रद्द करण्यात आली व त्यानंतर निर्णय रद्द करण्याची मागणी केल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकारने त्यावेळी न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र यावर अद्याप निर्णय झाला नसल्याने आरक्षणानुसार 33 टक्के जागा रिक्त ठेवून अन्य जागांवर सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मराठा आरक्षण न्यायालयात रद्द झाल्यानंतर याविषयीचा निर्णय बदलून 33 टक्के जागा रिक्त ठेवण्याचा निर्णय बदलून सरसकट सेवा ज्येष्ठतेनुसार आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
आज झालेल्या बैठकीत या निर्णयावरून संतप्त नितीन राऊत यांनी आरक्षणासंदर्भातील समितीला विश्वासात न घेता निर्णय घेतलाच कसा, असा सवाल केला. विशेष म्हणजे याविषयीची प्रेस नोट काढून अजित पवार यांच्या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त केल्याचे त्यात नमूद केले. मात्र त्यानंतर पुन्हा प्रेस नोट काढून त्यात आधीच्या भाषेत बदल करून या मुद्यावर तडजोड करणार नाही आरपारची भूमिका घ्यायला मागे पुढे पाहणार नाही अशा शब्दांत भावना मांडल्याचे प्रेस नोटमध्ये स्पष्ट करताना निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.


























































