कराडमधील व्यापाऱ्यांचा मालमत्ताकर माफ करावा, राजेंद्रसिंह यादव यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे सरकारने सर्वच व्यापाऱ्यांना व्यापार करण्यास मज्जाव केला आहे. संपूर्ण लॉकडाऊनमुळे व्यापारी आर्थिक अडचणीत आले आहेत. अनेक व्यापारी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे शहरातील सर्व व्यापाऱ्यांचा 2020-21 आणि 2021-22 या वर्षातील मालमत्ताकर पूर्णत: माफ करावा, अशी मागणी पालिकेतील सत्ताधारी जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की, कोवीड-19च्या प्रादुर्भावामुळे कराड शहरातील सर्व छोटे-मोठे उद्योगधंदे बंद आहेत. व्यापारी वर्गावर कर्जाचा बोजा, भाडे, कामगारांचा पगार व कुटुंब चालविणे अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या आहेत. गेली 2 वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्वच व्यापाऱ्यांना व्यापार करण्यास मज्जाव केला आहे. संपूर्ण लॉकडाऊनमुळे व्यापारी कोणताही व्यापार करू शकले नाहीत. त्यातच अनेक व्यापारी कर्जबाजारी झाले आहेत. त्यांना सध्या जगणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे शासन आणि पालिकेने शहरातील सर्वच व्यापाऱ्यांचा 2020-21 तसेच 2021-22 या वर्षातील मालमत्ताकर पूर्णपणे माफ करावा, असे म्हटले आहे.