
सामना ऑनलाईन, मुंबई
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, महागाई, कंत्राटी पद्धत, राफेल विमान खरेदीतील भ्रष्टाचार, शेतमालाचे भाव अशा मुद्दय़ांवरून मोदी सरकारच्या विरोधात सर्वसामान्यांमध्ये रोष वाढत आहे. हा रोष व्यक्त करण्यासाठी सामान्य मुंबईकरांसह राज्याच्या वेगवेगळय़ा भागातील कामगार, शेतकरी, विद्यार्थी असा लाखोंचा मोर्चा सोमवार, 8 ऑक्टोबरला ‘भाजप सरकार हटावो-संविधान बचावो’, ‘मोदी हटवा, देश वाचवा’ अशी मागणी करीत मंत्रालयावर धडकणार आहे, तर दुसरीकडे गिरणी कामगारांच्या संघटनेने भाजपला मतदान न करण्याचा निर्धार आज गांधी जयंतीच्या निमित्ताने व्यक्त केला.
फसव्या घोषणा
इंधनाच्या वाढत्या दरांपासून महागाईच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे 8 ऑक्टोबरला भायखळा येथील जिजामाता उद्यान ते मंत्रालय असा लाखोंचा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती कामगार नेते प्रकाश रेड्डी यांनी दिली. संपूर्ण राज्यातून हा मोर्चा मंत्रालयावर धडकेल. मोदी सरकारने एकाही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. देशातील प्रत्येक खातेदाराच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याची व दोन कोटी नोकऱ्यांचीही घोषणा केली होती. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे शेतमालाला भाव देण्यात येणार होता, पण एकाही आश्वासनाची पूर्तता भाजप सरकारने केली नाही. त्याशिवाय कंत्राटी पद्धती, सामाजिक सुरक्षा, धार्मिक द्वेश असे असंख्य प्रश्न आहेत. नोटाबंदीमुळे लहान व्यापारी देशोधडीला लागला लागला आहे. विमा व रिटेल क्षेत्रात परकीय गुंतवणुकीचा मार्ग मोकळा केला आहे. सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरलेले हे भाजप सरकार हटविण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे रेड्डी म्हणाले.
मूक आंदोलन
महात्मा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन केले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आदींनी मंत्रालयाच्या शेजारील गांधी पुतळय़ाजवळ मूक आंदोलन पुकारले. महागाई, बेरोजगारी, हिंसाचार, दलित व महिलांवरील अत्याचार अशा विषयांकडे यावेळी या नेत्यांनी लक्ष वेधले.
भाजपला मतदान करणार नाही
गिरणी कामगारांना मोफत घरे देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, ईपीएफ 95 योजनेतील पेन्शनधारकांना मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्याच्या मागणीसाठी गांधी जयंतीनिमित्त गिरणी कामगार व पेन्शनधारक, सर्व श्रमिक संघटना व गिरणी कामगार एकजूट समितीच्या वतीने चिंचपोकळीचे लाल मैदान ते करी रोडचे महाराष्ट्र मैदान असा मोर्चा काढला होता. गिरणी कामगारांच्या मान्य न झाल्यास भाजप सरकारला मतदान न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केल्याचे कामगार नेते उदय भट यांनी सांगितले.



























































