
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात पाकमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गेल्या दहा दिवसापासून जमियत उलेमा ए इस्लाम पक्षाचे मौलाना फजलूर रेहमान यांनी पाक सरकारविरोधात मोठे जनआंदोलन उभारले आहे. पाकमध्ये तीन महिन्यात निवडणुका घ्या यासह पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे सरकारने आंदोलकांना आझाद मार्च मागे घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या काही मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले, मात्र आंदोलक इम्रान खान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. शनिवारी आंदोलनाचा नववा दिवस असून पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
मौलाना फजलूर रेहमान म्हणाले, पंतप्रधान इम्रान खान यांनी 2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत घोटाळा केला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा देईपर्यंत कुठल्याच चर्चेला आम्ही तयार नाही. पाकचे संरक्षण मंत्री परवेझ खट्टक यांनी आंदोलन करा, पण देशाचे नुकसान करू नका, असे सांगितले. विरोधकांनी आपले मतभेद मिटवण्यासाठी सरकारकडे यावे असे आवाहन केले होते.



























































