
शहरातील नागरिकांच्या शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी मंजूर झालेल्या ‘सुळकूड पाणीपुरवठा योजने’ची अंमलबजावणी व कार्यवाही सुरू करा, या मागणीसाठी जनजागरण अंतर्गत शनिवारी (दि. 9) सकाळी 10 वाजता एक तास टिळक पुतळा ते शाहू पुतळा या मुख्य रस्त्यावर मानवी साखळीचे नियोजन कृती समितीतर्फे करण्यात आले आहे. यात नागरिक, महिला, विद्यार्थी यांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृती समितीच्या वतीने केले आहे.
‘सुळकूड पाणी योजने’बाबत राज्य सरकारने सोमवारी (दि.11) मुंबईत बैठक आयोजित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही जनजागरण मोहीम राबविली जात आहे. तसेच, या 25 हजार पोस्टकार्ड्स मुख्यमंत्र्यांना पाठविली आहेत. तसेच सह्यांच्या मोहिमेमध्ये 50 हजार नागरिकांनी सह्या केल्या आहेत, अशीही माहिती दिली. पोस्टकार्ड्स वेळेत उपलब्ध न झाल्याने ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे. सोमवारपर्यंत 50 हजार पोस्टकार्ड्स व 1 लाख सह्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल, असे कृती समितीकडून सांगण्यात आले.
येत्या गणेशोत्सव काळात ‘पाणी प्रदूषण’ या विषयावर देखावा स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. ‘प्रदूषित पाणी, त्यामुळे होणारे आजार, 2012 मधील काविळीचे बळी, अन्य विविध परिणाम, सुळकूड योजना व संबंधित बाबींवर मंडळांनी देखावे करावेत आणि त्याची नोंद कृती समितीकडे करावी. परिणामकारक देखाव्यांसाठी पारितोषिके दिली जातील, असे कृती समितीतर्फे सांगण्यात आले. यावेळी शशांक बावचकर, अनिल डाळ्या, महादेव गौड, प्रसाद कुलकर्णी, सदा मलाबादे, राजू आलासे, अभिजित पटवा, विकास चौगुले, प्रताप पाटील, जाविद मोमीन उपस्थित होते.





























































