सामना ऑनलाईन । पालघर
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज संतप्त नागरिकांनी संपूर्ण पालघर जिल्ह्यात बंद पाळून निषेध नोंदवला. हिंदुस्थानी जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत जिल्ह्यातील पालघर, बोईसर, डहाणू, विरार, वसई, नालासोपारा, सफाळे, मनोर येथे रिक्षा चालकांनी बंद पाळला. त्याचबरोबर बाजारपेठा देखील बंद ठेवण्यात आल्या.
नालासोपारा येथे संतप्त प्रवाशांनी रेलरोको आंदोलन केल्याने पश्चिम रेल्वेची वसई ते विरोर दरम्यानची वाहतूक ठप्प झाली होती. तर डहाणुहून चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या गाड्या विरार स्थानकातच खोळंबल्या होत्या. जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील निगरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बंद पाळला. जव्हार, विक्रमगड, वाडा, तलासरी कासा येथे देखील नागरिकांनी हल्ल्याचा निषेध करत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
नागझरी येथे परिसरातील नागरिकांकडून रास्ता रोको करून निषेध व्यक्त केला. यावेळी नागझरी, लालोंडे, किराट, बोरशेती, निहे, काटाळे, वेळगाव, चरी, गुंदळे या गावांतील नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
























































