
शाळांचे खासगीकरण आणि कंत्राटीकरणाविरोधात नागरिकांमध्ये सरकारविरोधात प्रचंड संताप पसरला असून, याचे पडसाद आज सांगलीत उमटले. आज सांगली शहरात सर्वपक्षीय मोर्चा काढून भाजप सरकारला जाब विचारण्यात आला. खासगी कंपन्यांना शाळा चालवायला दिल्यास बंद पडतील. याविरोधात सर्वांनी एकत्र येऊन 2024 मध्ये भाजप सरकार उलथून पाडण्याचा निर्धार करण्यात आला. या मोर्चाच्या निमित्ताने मिंधे सरकारच्या विरोधात जनसागर रस्त्यावर उतरला होता.
आमदार अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली बहुजन शिक्षण हक्क विचारमंचाने या मोर्चाचे नेतृत्व केले. आमदार सुमन पाटील, सत्यजित जाधव, डॉ. भारत पाटणकर, डॉ. बाबूराव गुरव, रावसाहेब पाटील, पृथ्वीराज पाटील, ऍड. सुभाष पाटील, स्वाती शिंदे-पवार, बाळासाहेब होनमोरे यांच्यासह मोठय़ा संख्येने नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. या वेळी ‘शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचे’, ‘शिक्षणाचे खासगीकरण करून स्वतःचा फायदा करू पाहणारे हे सरकार ताबडतोब घरी पाठवा’, अशा घोषणांनी नागरिकांनी परिसर दणाणून सोडला.
पुष्पराज चौकात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून व क्रांतीची मशाल प्रज्वलित करून मोर्चाला प्रारंभ झाला. जिल्हा परिषद, राम मंदिर चौक, काँग्रेस भवन या मार्गे मोर्चा स्टेशन चौकात गेला. मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने शिक्षक, कामगार, शासकीय कर्मचारी, चतुर्थश्रेणी कर्मचारी, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते सहभागी झाले होते. स्टेशन चौकात जाहीर सभा झाली. त्यावेळी विविध वक्त्यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर कडाडून हल्ला चढविला.
आमदार लाड म्हणाले, ‘हक्काच्या मोफत शिक्षणासाठी आमचे आंदोलन सुरूच राहील. सरकार ऐकत नसले तरी गप्प बसणार नाही. सरकारला ऐकायला लावू. हे सरकार पैसेवाल्यांचे आहे. भविष्यात यापेक्षा मोठे आंदोलन हाती घ्यावे लागेल.’
रावसाहेब पाटील म्हणाले, ‘राज्यातील 75 हजार शिक्षण संस्था बंद ठेवून सरकारला वठणीवर आणण्याचा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. जिल्ह्यातील 250 संस्थाही त्यात सहभागी असतील.’ धनाजी गुरव म्हणाले, ‘राज्यकर्ते खोटे बोलत आहेत. उत्पन्न वाढूनही शिक्षण, शेतीवर खर्च केला जात नाही. भांडवलदारांची भर केली जात असल्याचा आरोप करीत सरकारवर टीका केली.’



























































