थिएटरमध्ये प्रेक्षकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या, शिवसेनेची पालिका आयुक्तांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिनेमा थिएटरमध्ये प्रेक्षकांना पिण्याच्या पाण्याच्या बाटलीसाठी जवळपास शंभर रुपये मोजावे लागतात. अशाप्रकारे थिएटर चालक सर्वसामान्य प्रेक्षकांची अक्षरशः लूट करतात. या पार्श्वभूमीवर थिएटर तसेच मॉलमध्ये सर्वसामान्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे जार उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी शिवसेनेतर्फे पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

थिएटरमध्ये तिकिटांचे आणि खाद्यपदार्थांचे दर अवाच्या सवा असतात. दोन समोसे विकत घेतले तर त्यासाठी 200 रुपये, तसेच अर्धा लिटर पाण्याच्या बाटलीसाठी शंभर रुपये मोजावे लागतात. थिएटरमध्ये पाणी किंवा खाद्यपदार्थ घरून आणण्यास प्रेक्षकांना मनाई केली जाते. सिनेमा पाहताना लहान मुलांना, ज्येष्ठांना तहान लागते. परंतु पाण्याच्या बाटलीच्या अवाच्या सवा किमतीमुळे अनेकजण ते विकत घेऊ शकत नाहीत.

रेल्वे स्थानक, बस स्टॅण्ड, हॉटेल अशा सार्वजनिक ठिकाणी सर्वसामान्यांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होते. त्याचप्रमाणे मॉल आणि थिएटरमध्ये सर्वसामान्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे जार उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना उपनेते विलास रुपवते यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली.