लोकसभा निवडणुक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत ईव्हीएम मशीन बरोबरच व्हीव्हीपॅट मशीन वापरण्यात येणार असून त्याची माहिती नागरिकांना व्हावी या हेतूने निवडणूक आयोगाकडून याबाबत विशेष जनजागृती मोहीम शिरूर तालुक्यातील गावोगावी सुरू आहे, याचाच एक भाग म्हणून कवठे येमाई येथे लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी चित्ररथाद्वारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट कसे सुरक्षित आहे,याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.यामध्ये कोणत्याही परिस्थितीत या मशीन हॅक करता वा यामध्ये छेडछाड करता येत नाही हे नागरिकांना पटवून देण्यात आले.
नुकतेच कवठे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर यावेळी ईव्हीएम मशीन सह व्हीव्हीपॅट मशीन ठेवण्यात आले होते.या जनजागृतीमध्ये मतदान यंत्र कसे काम करते एखाद्या पक्षाला मत दिल्यानंतर मतदार त्याची खात्री कशी करू शकतो याचे थेट प्रात्यक्षिक निवडणूक अधिकाऱ्यांकडून दाखवण्यात येत होते. त्याचप्रमाणे मतदाराला कोणत्या शंका असतील तर त्याचे निरसनही करण्यात येत होते. आपण कोणाला मत देत दिले याची खात्री बाजूने ठेवलेल्या व्हीव्हीपॅट मशीनच्या सहाय्याने केली जाऊ शकते त्याचप्रमाणे त्या मतदानाची पावती त्याच यंत्रात संरक्षित केली जाते.
या मशीन संबंधी अतिशय सुरक्षितता पाळली गेलेली दिसून आली. यावेळी पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात याचे प्रात्यक्षिक दाखविले गेले.अलीकडे एका घटनेमध्ये ईव्हीएम युनिट चोरीला गेल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता पाळली जात असल्याची पहावयास मिळाले.या चित्ररथाला स्थानिक नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.यावेळी स्थानिक तरुण राहुल सांडभोर, शुभम सावंत यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करत प्रत्यक्ष अनुभव घेत समाधान व्यक्त केले.