वैजनाथ मंदिरात नियमांसह पुरोहितांना छोट्या महादेव पिंडीवर अभिषेकाची परवानगी

कोरोना महामारीच्या काळात धार्मिक स्थळे उघडण्यात आली आहेत. त्यामुळे मंदिरातील पुरोहित आणि बेलफुल विक्रेते आणि प्रसाद विक्रेते यांच्यावरील आर्थिक संकट दूर होण्याचे चिन्हे आहेत. दिवाळीच्या पाडव्याला मंदिर सुरू झाले. पण अभिषेक आणि इतर पूजा बंद असल्याने अर्थचक्र थांबले होते. आता काही नियमांसह अभिषेकाला परवानगी देण्यात आली आहे.

मराठवाड्यात असलेल्या दोन ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी अभिषेक ,पूजा नियम व अटीसह सुरू करण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी येथे वैद्यनाथ मंदिरात अद्यापही अभिषेक व पूजा करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. याबाबतीत पुरोहित वर्गांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज केला होता. त्याला उत्तर देत जिल्हाधिकारी यांनी वैद्यनाथ मंदिराच्या नीजगाभारा सोडून बाहेरील छोट्या महादेव पिंडीवर अभिषेक करण्याची परवानगी दिली आहे. याबाबतचे आदेश त्यांनी दिले आहेत. हे आदेशावर अप्पर जिल्हा दंडाधिकारी संतोष राऊत यांची स्वाक्षरी आहे. हा आदेश 21 जानेवारी रोजी तहसीलदार परळी यांना पाठवला आहे. आता अभिषेकाची परवानगी मिळाल्याने अर्थचक्र सुरळीत होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या