
सामना प्रतिनिधी । मुंबई
गणेशोत्सवानिमित्त बाजारात येणाऱ्या गुलाल, पिंजर, कुंकू, अबीर, शेंदूर आदी पूजा साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक रंग वापरण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पूजा साहित्यामध्ये भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने केली आहे.
गणेश आगमन-विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर गुलालाची उधळण केली जाते. भेसळयुक्त गुलालामुळे डोळे चुरचुरणे, खाज सुटणे असे त्रास होतात. कुंकू, हळद, अबीर, शेंदूर यामध्येही निकृष्ट दर्जाचे रंग वापरून बाजारात पुरवठा केला जातो.या पार्श्वभूमीवर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे सरचिटणीस ऍड. अरुण जगताप यांनी अन्न व औषधी प्रशासनाचे सहआयुक्त शैलेश आव्हाड आणि दा. रा. गहाणे यांची भेट घेऊन या वस्तूंमध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी केली. दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी आव्हाड यांनी दिले.
यावेळी शिष्टमंडळात कक्षप्रमुख उल्हास चवाथे, धर्मेश राठोड, ऍड. सुरेश मदने, युवराज हांडे, ललेश भगत, संदीप पाटील आदी उपस्थित होते.





























































