
सामना ऑनलाईन, पुणे
कश्मीरातील पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षिततेसाठी तैनात असलेल्या जवानांच्या पोस्टिंग माहितीची कागदपत्रे जवळ बाळगणाऱ्या एका संशयिताला बिहार दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुणे जिह्यातील चाकणजवळील खालुंर्बे गावातून जेरबंद केले. न्यायालयात हजर केल्यानंतर एटीएस पथक त्याला घेऊन बिहारला रवाना झाले.
शरियत अन्वर उल्लाहक मंडल (वय 19, मूळ रा. वाजिदपूर, जि. नादिया, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पुलवामा हल्ल्यानंतर लष्कराची माहिती तसेच जवानांची यादी दहशतकाद्यांना पुरविल्याप्रकरणी बिहार ‘एटीएस’ने काही दिवसांपूर्वी पाटणा जंक्शन येथून बांगलादेशातील झेनुडा जिह्यातील खैरूल मंडल आणि अबू सुलतान यांना अटक केली होती. त्यांची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांच्याकडून लष्कराची माहिती असणारी कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. दोघेही बांगलादेशातील बंदी घातलेल्या ‘जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश’ या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याची माहिती उघड झाली होती. त्यांचा साथीदार शरियत हा पुणे जिह्यातील चाकणजवळील खालुंर्बे परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती बिहार ‘एटीएस’च्या पथकाला मिळाली.
त्यानंतर बिहार ‘एटीएसने पुणे ‘एटीएस’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबंधित संशयिताची माहिती दिली. त्यानंतर बिहार एटीएस पुण्यात दाखल झाले. शरियत खालुंर्बे गावात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ठिकाणी काम करत होता. त्यानुसार पोलिसांकडून त्याच्या हालचालीवर पाळत ठेवून गुरुवारी शरियतला ताब्यात घेतले. त्यानंतर शरियतला प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) मिळवून बिहार ‘एटीएस’चे पथक रेल्वेने बिहारला रवाना झाले. चाकण पोलिसांना या कारवाईबाबतची माहिती देण्यात आली नक्हती.
शरियतकडून महत्त्वाची कागदपत्रे जप्त
पुलवामा हल्ल्यानंतर जवानांच्या पोस्टिंगसंदर्भात महत्त्वाची कागदपत्रे जवळ बाळगल्याप्रकरणी शरियतला बिहार एटीएसने चाकणमधून अटक केली. तो हिंदुस्थानातील विविध राज्यांत जाऊन तेथील मुस्लिम तरुणांना संघटनेत सामील होण्याचे आवाहन करत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. त्याच्याकडून इसिस व इतर दोन दहशतवादी संघटनेची भित्तीपत्रके, हँडबिल, दोन बनावट मतदान ओळखपत्र, बनावट पॅनकार्ड, तीन मोबाईल व एक मायक्रोचीप जप्त करण्यात आली आहे. शरियत अनधिकृतपणे खालुंर्बे गावात राहत होता. पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षिततेसाठी कश्मीरमध्ये तैनात असलेल्या अधिकाऱ्यांच्या नेमणूक आदेशाची छायांकित प्रत त्याच्याकडे आढळून आली आहे. शरियत दहशतवादी संघटना असलेल्या इस्लामिक स्टेट बांगलादेशचा सदस्य असून तो हिंदुस्थानात आयएसआयएस संघटनेच्या स्थापन आणि विस्ताराचे काम करत असल्याची प्राथमिक माहिती उघड झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
बिहार एटीएसची कारवाई
पुणे जिह्यातील चाकणमध्ये दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांना जेरबंद केल्याची ही वर्षभरातील दुसरी घटना आहे. यापूर्वी खलिस्तानवादी चळवळीशी निगडीत असलेल्या संबंधिताला एटीएसच्या पथकाने जेरबंद केले होते.

































































