
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले. जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. यामध्ये मलकापूर येथील संजय राजपूत (49) व लोणार तालुक्यातील गोवर्धननगर तांडय़ावरील नितीन शिवाजी राठोड या दोन जवानांना वीरमरण प्राप्त झाले. त्यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यावर शोककळा पसरली असून ठिकठिकाणी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
नितीन शिवाजी राठोड हे लोणार तालुक्यातील बीबी येथून जवळच असलेल्या गोवर्धननगर तांडा येथील रहिवासी आहेत. नितीन हे केंद्रीय राखीव दलाच्या तीन बटालियनमध्ये 2006 ला आसाममध्ये भरती झाले होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येथील आश्रमशाळेत झाले होते तर उच्च माध्यमिक शिक्षण दुसरबीड येथील जीवन विकास महाविद्यालयातून पूर्ण केले होते. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नितीनला लहानपणापासूनच सैनिकी सेवेची आवड होती. त्यांच्याकडे दीड एकर एवढी शेती आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आईकडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे.
मलकापूर येथील वॉर्ड नं. 21, लखानी प्लॉटमध्ये लहानाचे मोठे झालेले शहीद जवान संजय भिकमसिंग राजपूत 1996 मध्ये सीआरपीएफमध्ये रुजू झाले. पहिली पोस्टिंग त्रिपुरा येथे झाली. 11 वर्षांची देशसेवा केल्यानंतर पुन्हा पाच वर्षे सेवा वाढवून घेतल्यानंतर गुरुवारी जम्मू-कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात त्यांना वीरमरण प्राप्त झाले. या भ्याड हल्ल्याचे वृत्त जिल्ह्य़ात पोहचताच मलकापूरमध्ये शोककळा पसरली आहे. संजयला एक बहीण असून ती सुरतला राहते. विशेष म्हणजे सुरत येथील संजयचा भाचा पीयूष बयस यांच्यासोबत संजयचे दुपारी दीड वाजता जम्मूवरून श्रीनगरकडे जाताना मोबाईलवर बोलणे झाले होते. हा संजयचा शेवटचाच कॉल ठरला. संजयचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मलकापूर येथील नूतन विद्यालयात झाले असून अकरावी व बारावी जनता कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सीआरपीएफमध्ये दाखल झालेल्या संजयला वीरमरण प्राप्त झाल्याचे वृत्त समजताच मलकापूर शहरावर शोककळा पसरली आहे.
मलकापूरचे शहीद जवान संजय राजपूत यांना जय (12) व शुभम् (8) ही दोन मुले असून पत्नी सुषमा नागपूर येथे कुटुंबासमवेत राहत आहेत. आई जिजाबाई (78) मलकापूर येथे वास्तव्यास आहे. संजयला चार भाऊ व एक बहीण आहे. मोठा राजेश दीक्षित शेगाव येथे राहत असून संग्रामपूरला तलाठी पदावर कार्यरत आहे. दुसरा संजोग शारीरिक अपंग असून खासगी कामावर मलकापूर येथे आईजवळ राहतो. लहान भाऊ विक्रम याचा जुलै 2013 मध्ये मोटारसायकल अपघातात अंत झाला असल्याने या परिवारावर दुःखाचा डोंगर असतानाच दुसऱया मुलालाही वीरमरण प्राप्त झाल्याने म्हाताऱया आईवर सध्या डोंगर कोसळला आहे. 10 फेब्रुवारीला संजय राजपूत मलकापूरवरून आईची व मित्रांची भेट घेऊन नागपूरमार्गे चार-पाच दिवसांची सुट्टय़ा संपवून जम्मूकडे रवाना झाला होता. त्यांची ही शेवटचीच भेट ठरली आहे.
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत
शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांच्या कुटुंबांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी आज केली. बुलढाणा जिह्यातील संजय राजपूत आणि नितीन राठोड हे दोन जवान या हल्ल्यात शहीद झाले आहेत. या दोन्ही कुटुंबांच्या पुनर्वसनाची जबाबदारीही राज्य शासनातर्फे उचलण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवून मुख्यमंत्री म्हणाले, जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही. या शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत संपूर्ण देश असून त्यांच्या कुटुंबांचे संपूर्ण पुनर्वसन शासनामार्फत केले जाईल.

































































