वीजेचा धक्का बसून 14 वर्षाचा मुलगा ठार, निष्काळजीप्रकरणी महावितरण अभियंत्यावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्युत पुरवठा करणार्‍या जमिनीलगत वायरिंगला स्पर्श झाल्यामुळे धक्का बसून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना 23 ऑक्टोबरला कात्रज-कोंढवा रस्त्यावर बलकवडेनगर परिसरात घडली होती. याप्रकरणी निष्काळजीपणा बाळगल्याप्रकरणी महावितरणचे कात्रज विभागाचे अभियंता शिवलींग शरणप्पा बोरे यांच्याविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऋषिकेश पुजारी (14) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत मंजुनाथ होन्नया पुजारी (वय-57,रा.कर्वेनगर,पुणे) यांनी पोलीसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-कोंढवा रस्त्यावर बलकवडेनगर परिसरात एमएसईबी इलेक्ट्रीक खांबावरील विद्युत पुरवठा वायर जमिनीपासून साधारण चार फुट उंचीवर होती. वायर मुळे मानवी जिवितास धोका होण्याचा संभव असल्याचे माहिती असतानाही कात्रज एमएसईबी विभागचे अभियंता शिवलींग बोरे यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही.

निष्काळजीपणा व हलगर्जीपणा बाळगल्यामुळे तक्रारदार यांचा मुलगा ऋषिकेश याला 23 ऑक्टोबरला परिसरातून जात असताना विजेचा धक्का बसला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आकस्मित मृत्यू अशी नोंद केली होती. तपासाअंती एमएसईबीचे अभियंता दोषी असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात करीत आहेत.