मदत करण्याच्या बहाण्याने वृद्ध नागरिकाला गंडा, बँक खात्यातून लाखो रुपये लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एटीएम केंद्रातून पैसे काढणाऱ्य़ा ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याच्या बहाण्याने चोरट्याने हातचलाखीने त्यांचे डेबिट कार्ड चोरले. आणि त्यांच्या खात्यातून 5 लाख रुपये लंपास केले आहे. याबाबत काशिनाथ ढावरे (वय 61, रा. मार्केटयार्ड) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ढावरे  सहा महिन्यांपूर्वी लष्कर भागातील इस्ट स्ट्रीटवर असलेल्या एका बँकेच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या पाठोपाठ एक चोरटा एटीएम केंद्रात शिरला. त्याने ढावरे यांना एटीएम यंत्रातून रोकड काढून देण्याच्या बहाणा केला. त्यांच्याकडील डेबिट कार्ड घेतले. त्यानंतर मशीनमधून पैसे निघत नसल्याची बतावणी करून दुसरेच डेबिट कार्ड त्यांना दिले. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाचे डेबिट कार्डद्वारे खात्यातून पाच लाख आठ हजार रुपयांची रोकड लांबविली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली असून पोलीस आरोपीचा शोध सुरू आहे.