
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते पुणेदरम्यान खंबाटकी घाटातील खतरनाक ठरलेला ‘एस कॉर्नर’ आणि खंबाटकीचा घाटरस्ता नजीकच्या काळात इतिहासजमा होणार आहे. या घाटात दोन भव्य अशा बोगद्यांची निर्मिती केली जात आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळातही हे काम अखंडितपणे सुरू आहे. या बोगद्यांमधून वाहतूक सुरू झाल्यानंतर पुण्याकडे जाताना ‘एस कॉर्नर’चा धोका संपुष्टात येणार असून, पुण्याहून साताऱ्य़ाकडे येताना आठ किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे.
राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटाजवळ पुण्याकडे जाताना तीव्र उताराने धोकादायक ‘एस कॉर्नर’ पार करावा लागतो. हा ‘एस कॉर्नर’ वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा झाल्याचे वर्षानुवर्षे पाहायला मिळत आहे. आजवर या वळणावर अनेक भीषण दुर्घटना घडल्या असून, त्यामध्ये असंख्य लोकांना प्राणास मुकावे लागले आहे. कित्येकजण जन्माचे अधू झाले आहेत. त्यामुळे हा ‘एस कॉर्नर’ काढावा अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे.
या घटनेचे गांभीर्य पाहता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ‘एस कॉर्नर’ आणि घाटरस्ता या दोन्हींच्या जाचातून वाहनचालकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने या ठिकाणी दोन बोगद्यांसह 6.46 किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाला 28 फेब्रुवारी 2019 ला मंजुरी देण्यात आली होती. या कामाचे 493 कोटींचे बजेट आहे. हे काम सलग तीन वर्षे सुरू राहणार असून, 27 फेब्रुवारी 2022 ला बोगदा व रस्त्याचे काम संपवण्याची मुदत आहे. जून 2022 मध्ये सर्व काम संपून हा रस्ता रहदारीसाठी खुला होणार आहे. हा एकूण 6.46 किलोमीटरचा रस्ता आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूकडे 1.2 किलोमीटरचा बोगदा असून, पुण्याकडे जाताना बोगदा संपल्यानंतर कॅनॉलपर्यंत पुण्यातील दरीपुलाप्रमाणे उड्डाणपूल असणार आहे, तर कॅनॉलपासून पारगाव-खंडाळा येथील सर्व्हिस रोडपर्यंत भराव रस्ता होणार आहे.
हे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या वापरात असलेला साताऱ्य़ाहून पुण्याकडे जाताना सध्या वाहतूक सुरू असलेला बोगदा रस्ता हा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे धोकादायक ‘एस’ आकाराचे वळणही इतिहासजमा होणार आहे. पुण्याहून साताऱ्य़ाला जाण्यासाठी सध्या सुरू असलेला व घाट चढून जाणारा खंबाटकी घाटरस्ता हा आपत्कालीन परिस्थितीवेळी सुरू राहील. सातारा बाजूकडे या बोगद्याला सुशोभित करण्यात येणार असून, विविध झाडे, फुलझाडे क गोल डिझाईन बनविण्यात येणार आहे, तर पुणे बाजूकडे उड्डाणपूल बनविण्यात येणार आहे. तेथेही सुशोभीकरण करण्यात येणार आहे. सध्या कोरोना काळातही नियम पाळून बोगद्याचे काम गायत्री प्रोजेक्टकडून सुरू असून, एकूण 15 टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली.

























































