कुंभारगावचे पक्षी वैभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रल्हाद जाधव

अथांग या शब्दाचा अर्थ नेमका काय हे कुंभारगावचे पक्षी वैभव बघताना लक्षात येते. विस्तीर्ण जलाशय आणि त्यातील आनंदाने चिंब करणारे पाणपक्ष्यांच्या सहवासातील ते क्षण. सगळाच अनुभव अविस्मरणीय होता.

पुणे जिल्ह्यातील भिगवणजवळील कुंभारगाव हे पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध असलेले गाव. पुण्यापासून अंतर अंदाजे शंभर किलोमीटर. पक्षी निरीक्षणाच्या जागतिक नकाशावरील ते एक महत्त्वाचे ठिकाण ठरले आहे. उजनी धरणाच्या सुमारे नव्वद चौ.कि.मी.च्या बॅक-वॉटरमध्ये तीनशेहून अधिक प्रजातींचे पक्षी वर्षातील विविध हंगामात विहार करताना दिसतात. यातील सुमारे शंभर प्रजातींचे पक्षी आता तेथे कायमस्वरूपी वास्तव्यास असतात त्यांची वीण तेथेच होते म्हणजे ते आता तेथील कायमचे रहिवासी आहेत आणि आपण ही जगाला अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट आहे. 14 फेब्रुवारी रोजी आमच्या दहा जणांच्या ग्रुपने येथील पक्षी वैभवाचा अनुभव घेतला. आमच्या नाविकाने पश्चिम आणि पूर्व अशा दोन भागांत आमच्या पक्षी निरीक्षणाचे नियोजन केले होते. नाविकाचे नाव कुंदन, पण तो उत्तम पक्षी निरीक्षक आणि व्यावसायिक गुणवत्ता असणारा गाईडही होता. इतकेच नव्हे तर एक छान निसर्गप्रेमी आणि फावल्या वेळात नजीकच्या महाविद्यालयात जाऊन बी. कॉम.चे शिक्षण घेणारा संवेदनशील विद्यार्थीही होता. कुंभारगाव हे सामान्यपणे फ्लेमिंगोसाठी (रोहित पक्षी ) ओळखले जाते, पण सुमारे तीनशे प्रकारच्या पक्षी दर्शनामुळे असे एकच एक लेबल लावून त्याकडे पाहणे उचित ठरत नाही. आम्हाला तेथे दोन दिवसांत फ्लेमिंगोबरोबरच विविध प्रकारचे बगळे, करकोचे, हेरॉन, आयबीस, हंस, बदके, पाणकावळे, खंडय़े, समुद्रपक्षी, जांभळी पाणकोंबडी, भोरडय़ा या पाणपक्ष्यांबरोबरच नेहमीचे शिंपी, धोबी, कवडे, वेध राघू, दयाळ, चंडोल, सूर्यपक्षी असे असंख्य पक्षी दर्शन देऊन गेले. प्रत्येक पक्ष्याचा स्वभाव वेगळा, रूबाब वेगळा, वैशिष्टय़े वेगळी, सूर वेगळा! राग, लोभ, प्रेम, वात्सल्य अशा अनेक भावनांचे दर्शन आम्हाला विविध पक्ष्यांनी घडवले. एखाद्या माणसाला स्वर्गसुखाचा आनंद मिळवायचा असेल तर त्याने इतर फंदात न पडता पक्षी निरीक्षणाची सोपी पायवाट पकडावी असे एमिली डिकिन्सन या कवयित्रीने म्हटले आहे. किती खरे आहे ते!

पक्ष्यांना भूमीच्या मर्यादा नसतात. ते साऱया जगाचे नागरिक असतात. त्यांना जगभर फिरण्याचा निसर्गदत्त परवाना असतो. त्यासाठी त्यांना कोणतेही आधारकार्ड किंवा पासपोर्ट लागत नाही. पक्षी निरीक्षकांचेसुद्धा असेच असते. पहिल्या दिवशी रात्री बाजूच्या टेकडीवर फिरायला जायचे ठरले. आमचे सहलप्रमुख उदय परब याबाबतीत खूप हौशी. त्यांचा हा निर्णय आम्हाला एक प्रकारचा बोनस होता. कुंदन हा हरहुन्नरी तरुण वनविद्येतही पारंगत. रात्री दहा ते बारा या दोन तासांत त्याने आम्हाला रातवा (नाईट जार), चंडोल, ब्ल्यू रॉबिन, विविध पाकोळ्याशिवाय पाली, सरडे आणि सापाचेही दर्शन घडविले. शॅमेलॉन हा एक विशिष्ट जातीचा सरडा हे त्या भ्रमंतीचे मुख्य आकर्षण ठरले. तीनशेसाठ अंश कोनातून आपले डोळे कुठेही फिरवणारा हा हिरवा मखमली सरडा अनेकांनी आपल्या मोबाईलवर टिपून घेतला.

संदीप आणि त्याचे कुटुंबीय निवास-भोजनापासून ते नौकानयनापर्यंत पक्षी निरीक्षकांची सगळी व्यवस्था उत्तमपणे करत असतात. आमच्या भोजनात खरपूस तळलेला एक दांडगा मासा माझ्या थाळीत होता. हा कोणता असे विचारताच ‘तिलापिया’ असे उत्तर संदीपने दिले. ते ऐकून मी क्षणभर स्तब्ध झालो. कारण स्थानिक माशांच्या वाढीस तिलापिया बाधक ठरत आहे हे मला माहीत होते. कानामागून आला आणि तिखट झाला अशा प्रकारात मोडणारा हा मासा महाराष्ट्रभर सर्वत्र झपाटय़ानं वाढत आहे. उजनी जलाशयातील त्याची टक्केवारी पंच्याहत्तरवर पोचली आहे, असे संदीपने सांगितले. ते ऐकून मी नकळत एका आक्रमक पद्धतीने त्याचा फडशा पाडला! आमच्या ग्रुपमध्ये डॉ. छाया सावंत या बिनीच्या फोटोग्राफर सहभागी होत्या. त्यांनी आणि उदय परब यांनी काढलेल्या छायाचित्रांनी आमचीही छोटीशी पक्षीयात्रा संस्मरणीय करून टाकली. पक्षी निरीक्षण आणि छायाचित्रण या दोन्ही कला कशा हातात हात घालून जातात याचीही सुखद जाणीव या यात्रेने करून दिली.

चंडोल हा पक्षी वर उडताना स्वर्गाचे तर खाली उतरताना पृथ्वीचे गाणे गातो अशा आशयाचा संदर्भ व्यंकटेश माडगूळकर यांच्या लेखनात कुठेतरी आला आहे. रात्रफेरीत या चंडोलाच्या झालेल्या दर्शनाने मला ते आठवले आणि मी मोहरून गेलो. जागोजागी विखुरलेली तरवडाची झुडपं आणि त्यावरील पिवळी फुलं पाहून माझ्यासमोर माडगूळकर यांच्या लेखनातील माणदेश उभा राहिला. रात्री कुंभारगावात खंडोबाचे जागरण सुरू होते, तिथेही आम्ही रेंगाळलो, फोटो काढले. हलगी, झांज आणि संमोहित करणाऱया त्या लोकगीताची लय मेंदूत कायमची भरून राहिली आहे.

– [email protected]