
दि. 13 ते 21 डिसेंबर या कालावधीत पुण्यामध्ये नॅशनल बुक ट्रस्टद्वारे भव्य पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कालच या महोत्सवाचे उद्घाटन झाले आणि अगदी पहिल्या दिवसापासूनच रसिक वाचकांचा भरघोस प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रतिसाद पाहता यंदाही हा महोत्सव विश्वविक्रम करणार असे दिसत आहे. पुस्तक महोत्सवाला भेट देणाऱयांची संख्या पुस्तक खरेदीमध्ये परावर्तित व्हावी आणि लेखक, प्रकाशक, ग्रंथ व्यावसायिक यांना याचा लाभ व्हावा याच सदिच्छा! अर्थात पुण्यात हा महोत्सव पार पडत असला तरी पुणे केंद्रस्थानी असल्याने राज्यभरातून इथे ग्रंथ खरेदीसाठी येणाऱयांची संख्या जास्त आहे. मागील वर्षी हा महोत्सव चांगला प्रसिद्ध झाल्याने यंदा ही संख्या अधिक वाढणार याची खात्री आहे. सोबत नॅशनल बुक ट्रस्टद्वारे महोत्सवाची प्रसिद्धी व्हावी यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून महोत्सवापूर्वी `शांतता पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम नुकताच पार पडला. सध्या भारतातील मुख्य शहरांतून साहित्य महोत्सव अर्थात लिट फेस्ट आयोजित केले जातात. पुणे पुस्तक महोत्सवाचे स्वरूपही काही अंशी असेच असले तरी ग्रंथ व्यवहार हाच या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. खरा पुस्तकप्रेमी वाचकही त्याच ओढीने या महोत्सवाला भेट देतो. असं हे पुस्तकांचं आणि वाचकांचं जग विस्तारत जावो.


























































