बसस्टॉपवर झोपलेल्या एका प्रवाशाचा खुन केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री पावने नऊच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरात घडला आहे. संजय बाबु कदम (वय 35, रा. घाटकोपर) असे खून झालेल्याचे नाव आहे. ते मूळचे लातूर जिल्ह्यातील रहिवाशी असून अनेक दिवसापासून मुंबईत घाटकोपर येथे स्थायिक होते. चोरीच्या उद्देशाने त्यांचा खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संतोष काजळे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संजय कदम हे शिरुर तालुक्यातील आंबेगाव येथे एका हॉटेलमध्ये काम करत होते. ते सध्या घाटकोपर येथील परेरावाडी येथे वास्तव्यास होते. मागील काही वर्षापासून ते आई- वडीलांसोबत राहत होते. दरम्यान मंगळवारी रात्री घरी जाण्यासाठी ते पुण्यात आले होते. परंतु, गावी जाण्यासाठी बस नसल्याने ते रात्री साधु वासवाणी चौकातून अंलकार चित्रपटगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका बसस्टॉपवर झोपले होते.
मध्यरात्री कोणीतरी त्यांच्या डोक्यात आणि डोळ्यावर हत्याराने वार करुन त्यांचा खुन केला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
बस स्थानकाजवळ झोपले असताना संजय कदम यांच्या डोक्यात वार करून खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या खिशामध्ये मोबाईल नंबर मिळून आला होता. त्यावर संपर्क केल्यानंतर त्यांची ओळख पटली. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
– यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन पोलिस ठाणे
























































