गुंडाराज, मिंधे सरकारच्या राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा; पुण्यात भरदिवसा बंदुकीचा थरार!

पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून, कायदा-सुव्यवस्था शिल्लक आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटल परिसरातील दुर्गा कॅफेजवळ एका सराफा व्यावसायिकाने दुकान मालकावर गोळीबार केला. धक्कादायक म्हणजे भररस्त्यात दुचाकीवरून बंदुकीचा हा थरार घडला. या हल्ल्यात दुकानमालक गंभीर जखमी झाला असून, हल्लेखोर सराफ व्यवसायिकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

आकाश गजानन जाधव असे गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या दुकानमालकाचे नाव आहे. तर, अनिल सखाराम ढमाले असे आत्महत्या केलेल्या सराफ व्यावसायिकाचे नाव आहे. ही घटना बाणेर येथे शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल ढमाले हा सराफ व्यावसायिक आहे. तर, आकाश जाधव यांचे बाणेर येथील हाय स्ट्रीट परिसरात दुकान आहे. जाधव यांनी ढमालेला अनेक वर्षापासून दुकान भाडय़ाने दिले आहे. ढमालेचे ज्वेलर्स दुकान आहे. आकाश जाधवचे पैसे ढमालेकडे होते. ढमाले पैसे परत करत नव्हता यावरून त्याच्यांत आर्थिक वाद होते.