पुण्यात कार्ड क्लोनिंगचा पर्दापाश, बनावट एटीएमद्वारे पैसे काढणारे दोन नायजेरियन अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एटीएम मशीनमध्ये स्किमर आणि कॅमेरे बसवून नागरिकांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती चोरुन बनावट एटीएम कार्डद्वारे पैसे लुटणाऱ्या दोघा नायजेरियन नागरिकांना पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने अटक केली. त्यांच्याकडून बनावट एटीएम कार्ड, एटीएम कार्ड रिडर, सॉफ्टवेअर सिडी असा मुद्देमाल जप्त केला आहे.

ननम गॅब्रीअल चुकुवूबुका (रा. औंध मिलटरी स्टेशन जवळ, पिंपळे निलख, मुळ रा. नायजेरिया), बशीर ऊर्फ लुकास विल्यम ऊर्फ ओमोईके गॉडसन (रा. जगताप डेअरीजवळ, रहाटणी, मुळ रा. नायजेरिया) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एटीएमकार्डचा वापर केलेला नसतानाही एका बँकखातेदाराच्या खात्यातील 1 लाख 10 हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी काढल्याची तक्रार सायबर विभागाला मिळाली होती.

संबंधित व्यवहार नाशिक फाट्यावरील कासारवाडी परिसरातील एटीएम सेंटरमध्ये घडली होती. त्यानुसार सायबर पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू होता. त्यानुसार पोलिसांनी तक्रारदारासमवेत जाऊन 29 एप्रिलला संबंधित एटीएमभोवती सापळा रचला. त्यावेळी दुचाकीवरून आलेला नायजेरियन बनावट एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.

झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे बँकांचे दोन बनावट एटीएम कार्ड, दोन नागरिकांची नावे असलेली एटीएम कार्ड पोलिसांनी जप्त केली. त्यापैकी एका बनावट एटीएम कार्डवर तक्रारदारांच्या एटीएम कार्डचा पीन क्रमांक लिहीला होता. चौकशीत आरोपीने बनावट एटीएम कार्ड पुरविणाऱ्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी गुरूवारी पिंपरी-चिंचवडमधील एका हॉटेलमधून गॉडसनला ताब्यात घेतले. त्याच्याकडून वेगवेगळ्या बँकांची 10 एटीएम कार्ड,बनावट एटीएम कार्ड, एटीएम कार्ड रिडर, सॉफ्टवेअर सिडी असा ऐजव जप्त केला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस.हाके, पोलिस निरीक्षक कुमार घाडगे, पोलिस उपनिरीक्षक अनिल डफळ, नीतेश शेलार, सचिन वाजे, अनिल पुंडलिक, सोमनाथ भोरडे, संदीप यादव, प्रवीणसिंग राजपूत, सौरभ घाटे, राहूल हंडाळ, गिरीमल्लेष चलवादी, किरण जमदाडे यांच्या पथकाने केली.