पुणे शहरात टोईंग कारवाई पुन्हा सुरू, नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टोईंग वाहनांव्दारे ‘नो पार्किंग’मधील वाहने उचलण्याच्या कारवाईमध्ये अनियमितता आढळून आल्याने पुणे शहरात स्थगित केलेली ‘टोईंग’ कारवाई महिनाभरानंतर पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. नव्याने कारवाई सुरू करताना टोईंग वाहनांवरील खासगी कर्मचाऱ्यांना काही नियम घालून देण्यात आले आहेत. तसेच, टोईंग वाहनांवरील सीसीटीव्ही सुरू ठेवण्यासह दिवसभरात उचललेल्या वाहनांची नोंद ठेवण्यासाठी नोंदवही जतन करण्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे वाहने उचलण्याच्या कारवाईत पारदर्शकता येणार आहे.

शहरात ‘नो पार्किंग’मध्ये बेशिस्तपणे उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी अत्याधुनिक असे टोईंग वाहने नेमण्यात आली आहेत. ‘विदर्भ इन्फोटेक’ या कंपनीची ही वाहने असून सद्यस्थितीत वाहतूक शाखेकडे या कंपनीची 26 टोईंग वाहने आहेत. यामध्ये वाहने टोईंग करण्यासाठी खासगी व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे. तर, प्रत्येक टोईंग वाहनासोबत एका पोलीस कर्मचाऱ्याला नियुक्ती देण्यात आली आहे. अनेकदा नो पार्किंगमधील वाहने उचलताना टोईंग कर्मचाऱ्यांकडून वाहनचालकांवर दादागिरी केली जाते. काहीवेळा अशा घटनांमध्ये वाहनचालकांचीही चूक असते. परंतु, पोलिसांना यासाठी जबाबदार धरले जाते. यामध्ये पारदर्शकता यावी आणि गाडी उचलण्याच्या घटनेचे चित्रिकरण व्हावे, यासाठी शहरातील सर्व टोईंग वाहनांना सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक टोईंग वाहनांवरील सीसीटीव्ही बंदस्थितीत होते. तसेच, टोईंग कारवाईत खासगी व्यक्तीचा हस्तक्षेप वाढला होता. केवळ वाहने उचलणे आणि खाली ठेवणे एवढेच काम करणे अपेक्षित असताना खासगी कर्मचाऱ्यांकडून नागरिकांकडे लायसन्सची मागणी केली जायची. तसेच, त्यांच्याकडून दंडही स्विकारला जायचा.

याबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून जून महिन्यात संपुर्ण शहरातील टोईंग कारवाई बंद ठेवण्याची सूचना केली होती. त्यामूळे मागील महिन्याभरापासून शहरात वाहने उचलण्याची कारवाई बंदच होती. मात्र, महिन्याभरानंतर आता पुन्हा एकदा वाहने उचलण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. यासाठी शहरातील सर्व वाहतूक विभागांना सूचना करण्यात आल्या आहेत.

नो पार्किंगमधील वाहने उचलण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. यासाठी एक नियमावली तयार करण्यात आली असून नियमाच्या अधिन राहून कारवाई करण्याचे सांगण्यात आले आहे.
– राहुल श्रीरामे, उपायुक्त, वाहतूक शाखा.

…हे नियम पाळावे लागणार

वाहनांवरील सीसीटीव्ही सुरू ठेवणे
वाहनांमध्ये नोंदवही ठेवणे
खासगी कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी थेट संपर्क नाही
वाहने उचलताना चित्रीकरण करणे