मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज किल्ले शिवनेरीवर

1293

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यानिमित्त बुधवारी सकाळी 10.30 वाजता शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त भगव्या पताका व ध्वजांनी जुन्नर परिसर भगवामय झाला आहे. जागोजागी स्वागत कमानी उभारल्या असून छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, शिवजन्मस्थळ, पंचायत समिती, नगरपालिका इमारतीसह सर्व शासकीय इमारतींना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, वनमंत्री दत्तात्रय भरणे, शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार शरद सोनवणे, सुरेश गोरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माऊली कटके, सहसंपर्कप्रमुख सुरेश भोर, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, संभाजी तांबे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, प्राजक्ता तनपुरे, युवासेनेचे सचिन बांगर, प्रवीण थोरात आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जुन्नर शहर सज्ज झाले आहे. येथील शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाचे मैदान आणि किल्ले शिवनेरीवर हेलिपॅड सज्ज ठेवण्यात आले आहे. राज्याच्या विविध भागांतून येणारे शिवप्रेमी किल्ले शिवनेरीवरून शिवज्योत प्रज्वलित करून गावोगावी नेतात व उत्सव साजरा करतात. आठ दिवसांपासूनच शिवज्योत नेण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवला असून प्रशासनानेदेखील जय्यत तयारी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या