पुणे – कोयत्याच्या धाकाने कंत्राटदारांना लुटले, टोळक्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोयत्याचा धाक दाखवून कंत्राटदारांना अडवून त्यांच्याकडील 18 हजारांची रोकड चोरणाऱ्या टोळक्याला खडकी पोलिसांनी अटक केली. ही घटना 28 जुलैला रात्री एकच्या सुमारास खडकीतील मुळा रस्ता सर्कल परिसरात घडली.

सागर अशोक जगताप (वय 30), सुजीत सुधीर म्हस्के (वय 27) शुभम राजेश कदम ( वय 24), राहूल धर्मपाल यादव (वय 21) , सतीश शिवकुमार यादव (वय 31 सर्व रा. खडकी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रामचंद्र रतन शिंदे (वय 40 रा. पिसोळी ) यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

रामचंद्र शिंदे आणि अतुल बाभळे हे कंत्राटदार असून पुणे महानगरपालिकातंर्गत ड्रेनेज व पाईप लाईन टाकण्याचे काम करतात. खडकी परिसरातील होळकर पूल ते चिखलवाडीत पिण्याचे पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. रामचंद्र आणि अतुल 28 जुलैला रात्री साडेबाराच्या सुमारास कामगारांसह पाईप घेउन निघाले होते. त्यावेळी मुठा रस्ता परिसरात टोळक्याने त्यांना अडवून कोयत्याचा धाक दाखविला. त्यांच्याकडील 18 हजारांची रोकड, मोबाइल पाकीट चोरून नेले.

याप्रकरणी खडकी पोलिसांनी आरोपींचा माग काढून अटक केली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, एसीपी आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक मोहन साळवी यांच्या पथकाने केली.