धक्कादायक! नगरसेवकाच्या लेटरपॅडचा वापर करुन शिपायाचा एकाला दीड लाखांचा गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

नामांकित शाळेमध्ये मुलाला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने संबंधित शाळेतील शिपायानेच नगरसेवकाच्या लेटरपॅडचा वापर करुन बनावट सही केली. त्यानंतर मुलाला शाळेत प्रवेश देउन पालकाकडून दीड लाखांची रोकड उकळली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विजय नानासाहेब यादव (वय – 30, रा. उंड्री) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी साईनाथ बाबर (वय – 38, रा. एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्रीतील एका नामांकित शाळेमध्ये विजय शिपाई म्हणून कार्यरत आहे. त्याने एकाच्या मुलाला शाळेत प्रवेश मिळवून देण्याची बतावणी करुन दीड लाख रुपये घेतले. त्यासाठी विजयने नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या लेटरपॅडचा वापर करुन संबंधित पाल्यांचा अर्ज टाईप केला. त्यानंतर विजयने साईनाथ यांची बनावट सही करुन मुलाला शाळेत प्रवेश मिळवून दिला. ऑडिटदरम्यान लेटरपॅडवरील सही बनावट असल्याचे दिसून आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चैत्राली गपाट अधिक तपास करीत आहेत.