
महिलेकडे 50 हजारांची खंडणी मागणार्या सराईताला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने अटक केली. तर, त्याच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे.
गणेश मारुती मांगडे (28, रा.सच्चाई माता मंदिर, वाघजाईनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत 28 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला पतीपासून विभक्त राहते. आरोपी आणि फिर्यादीचे पती ओळखीचे आहेत. फि़र्यादीच्या पतीला पैसे पाठवायचे आहेत, असे सांगून दोन दिवसांपूर्वी आरोपी मांगडे याने महिलेकडे 50 हजारांची खंडणी मागितली.
याप्रकरणी मांगडे आणि साथीदार चेतन सरोदे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. गुन्हे शाखेच्या पथकाकडून आरोपीचा शोध घेण्यात येत होता. या दरम्यान मांगडे हा कात्रज परिसरात असल्याची माहिती खंडणी विरोधी पथक एकचे हवालदार किरण ठवरे, अमोल आवाड यांना मिळाली. यानुसार सापळा रचून मांगडेला ताब्यात घेण्यात आले. खंडणीविरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अभिजीत पाटील, उपनिरीक्षक यशवंत ओंबसे, अंमलदार सयाजी चव्हाण, प्रफुल्ल चव्हाण यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

























































