पुणे – तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न, एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

किरकोळ कारणावरून टोळक्याने तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नऱ्हे परिसरातील झील कॉलेज चौकात रविवारी रात्री घडली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. विशाल बालाजी वाघमारे (वय 21, रा. काकडे वस्ती, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. इतर सात ते आठ जणांचा शोध सुरू आहे. याबाबत सुमित वैराट (वय 36, रा. नऱ्हे) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित व त्याचा मित्र समर्थ गुरव हे झील कॉलेज चौकात रविवारी सायंकाळी गप्पा मारत होते. त्यावेळी सोबतची काही मुले सुमितसोबत फिरत असल्याचा राग विशालला आला. त्यामुळे त्याने इतर साथीदारांना सोबत घेऊन रविवारी सायंकाळी सुमितला दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर कोयत्याने व कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ तपास करत आहेत.