
कोवीड चाचण्यांचे टेस्टींग कीट बनविणाऱ्या माय लॅब कंपनीच्या नावाशी संबंध असलेल बनावट डोमेन तयार करून नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी गुजरातमधील दोघांना अटक केली आहे. संस्कार संस्कृत उर्फ रुषी (वय 19) आणि प्रशांत सिंग ऊर्फ गुट्टू (वय 24, दोघेही रा. जामनगर, गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार भावेश पासवान याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चेतन सोनराज रावळ (वय 34, रा. बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपींनी माय लॅब कंपनीच्या नाम साधम्र्याचा वापर करून नवीन डोमेन तयार केले. त्याद्वारे त्यांनी बनावट सेल्स ऑर्डर तयार केली. त्याशिवाय बनावट फेसबुक पेज तयार करून त्यामार्फत चेतन रावळ यांना संबंधित कंपनी कोरोनाच्या चाचणी किट प्रॉडक्ट विकणारी असल्याचे भासवून ईमेल, बँक खाती, फोनद्वारे फसवणूक केली आहे. ही कामगिरी आर्थिंक व सायबर विभागाच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण, संदेश कर्णे, जाबा, नवनाथ जाधव, अनिल पुंडलीक, नितीन चांदणे यांनी केली.


























































