नागरिकांनो सावधान; सायबर चोरट्यांकडून डि-मार्टच्या नावाखाली गिफ्टचे आमिष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहराबरोबर आता ग्रामीण भागामध्येही सायबर चोरट्यांनी डाव टाकण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार डिमार्टच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त ऑफरच्या नावाखाली ग्रामीण भागातील नागरिकांना पाच हजारांचे आमिष दाखवून बँकखाते मोकळे करण्याचा प्रयत्न सायबर चोरट्यांकडून केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनो सावधान पाच हजार रूपयांच्या आमिषाला भुलून बँकखात्याची गोपनीय माहिती शेअर केल्यास तुमची फसवणूक होउ शकते. त्यामुळे आर्थिंक फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

जिल्ह्यातील विविध भागात सायबर चोरट्यांकडून नामी क्ऌप्ती वापरून डिमार्टच्या नावाचा वापर करण्यात येत आहे. त्यानुसार लिंक तयार करण्यात आली असून 20 व्या वर्धापनदिनाचे निमित्त सांगून आर्थिक फसवणूकीचे जाळे टाकले जात आहे. त्याशिवाय 5 हजारांचे बक्षिस मिळविण्यासाठी संबंधित बनावट लिंक 20 मित्रांना शेअर करण्याचे सांगितले जात आहे. पैशांच्या आमिषाला भुरळून अनेकांकडून डिमार्ट 20 वा वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांना ऑफर, मोफत भेटवस्तू देण्याचा दावा केला जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 6 नागरिकांची अशाचपद्धतीने फसवणूक करण्यात आली आहे. ग्रामीण भागासह शहरातील अनेकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये ही बनावट लिंक व्हायरल झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी केले आहे.

स्पिन व्हील अन पाच हजारांचे आमिष

सायबर चोरट्यांकडून डिमार्ट कंपनीच्या नावाने लिंक तयार केली आहे. त्याद्वारे कंपनीच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्त ग्राहकांना मोफत भेटवस्तू देण्याचा दावा केला जात आहे. संबंधित लिंक जास्तीत जास्त मित्रांना शेअर केल्यास मोठे बक्षीस देणार असल्याचेही आमिष दाखविले जात आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत बहुतांश गावासह शहरातील सर्रास मित्रांना लिंक पाठविण्यात आली आहे. त्याद्वारे डिमार्ट संदर्भात चार प्रश्न विचारून स्पिन व्हील (फिरते चक्र ) मोबाईल स्क्रीनवर दिले जाते. त्यावर क्लिक केल्यानंतर चक्र फिरवून 5 हजारांचे बक्षीस जिंकल्याचे भासविले जात आहे. त्यानंतर लिंक पाच गु्रप आणि 20 मित्रांना शेअर करण्यास सांगितले जाते. मोबाइलवरील ब्लू बार पुर्ण होईपर्यंत लिंक शेअर करण्यास भाग पाडले जात आहे. दरम्यानच्या कालावधीत सायबर चोरट्यांकडून बँकखात्याची गोपनीय माहिती विचारून ऑनलाईन गंडा घातला जात असल्याचे सहा तक्रारींवरून निष्पन्न झाले आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांचे आवाहन

  • फसव्या लिंक न उघडता काळजी घ्यावी
  • बँकखात्याचा ओटीपी कोणालाही शेअर करू नये
  • मोबाईलमध्ये अनोळखी अ‍ॅप डाउनलोड करू नये
  • अनोळखी फोन कॉल्सला उत्तर देउ नका
  • बँकखात्याची माहिती कोणालाही देउ नका
  • सोशल मीडियाचा वापर करताना दक्ष राहा
  • फसव्या आमिषांना बळी पडू नका

नागरिकांनी आमिषापासून दूर राहिल्यास फायदा

सायबर चोरट्यांकडून खासगी कंपनीच्या वर्धापनदिनानिमित्त बनावट लिंक तयार करून आर्थिंक फसवणूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेउन लिंक न उघडता, व्हायरल न करता आर्थिंक फसवणूक टाळावी. त्याशिवाय विविध आमिष, गिफ्टचा हव्यास करू नये. नागरिकांनी बनावट लिंक, व्हायरल मेसेज फॉरवर्ड न करता आर्थिक फसवणूक टाळावी. – डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण