महिला रिक्षाचालक महिलेवर प्रवाशाने केला अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या आरोपीने चालक महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना कात्रज घाटात घडली आहे. आरोपीने अंगावरील सर्व कपडे काढून नग्न अवस्थेत महिलेला शरीर संबंधासाठी जबरदस्ती केली. त्यामुळे महिलेने अंधारात रिक्षातून उतरून पळ काढल्यानंतर आरोपीने तिचा नग्न अवस्थेतच पाठलाग केला. काही वेळाने महिलेने स्वत:ची सुखरूप सुटका करून घेत पोलिसांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला अटक केली. ही घटना 26 डिसेंबरला रात्री आठच्या सुमारास घडली.

निखिल अशोक मेमजादे (30, रा. हडपसर) असे अटक केलेल्या प्रवाशाचे नाव आहे. याबाबत रिक्षाचालक महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला रिक्षा चालवून उदरनिर्वाह करते. 26 डिसेंबरला रात्री नऊच्या सुमारास मगरपट्टा येथून आरोपी निखील त्यांच्या रिक्षात बसला. त्याने कात्रज घाटात जायचे असल्याचे सांगितले. रात्री दहाच्या सुमारास कात्रज घाटात गेल्यानंतर त्याने अंधार पाहून लॉजिंग बोर्डजवळ महिलेला रिक्षा थांबविण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी निखीलने महिलेला जेवणासाठी बळजबरी केली.

त्यांनी नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्या गालात चापट मारत शारीरिक संबंधाची मागणी केली. ‘मला तुझ्या सोबत इथेच शारीरिक संबंध करायचे आहेत, अंधारात तुझ्या मदतीला कोणीही येणार नाही तुला काय करायचे ते कर’ असे बोलून त्याने अंगातील कपडे काढले. त्यामुळे महिला चालक घाबरून रिक्षातून खाली उतरून पळू लागल्या. त्यानंतर आरोपीनेही नग्न अवस्थेत महिलेचा काही अंतरावर पाठलाग केला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर निखिल मेमजादे याला अटक केली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा घोगरे, अमलदार वीर यांनी केली.

आरोपीला अटक
प्रवासाच्या बहाण्याने महिला रिक्षाचालकाला कात्रज घाटात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न करणार्‍या आरोपीला अटक करण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोधमोहीम राबवून संबंधित आरोपीला पकडण्यात यश आले. आरोपी व्हिडिओ ग्राफीची कामे करीत असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

– वर्षा घोगरे, पोलीस उपनिरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे