शस्त्राच्या धाकाने लूटमार करणार्‍या टोळीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लिंबू सरबत विक्रेत्याला शस्त्राचा धाक दाखवून दीड हजारांची रोकड लुटून नेणार्‍या टोळीला खडकी पोलिसांनी अटक केली. ही घटना 4 डिसेंबरला रात्री पावणेदहाच्या सुमारास खडकी बाजार परिसरात घडली होती.

आयुष नागेश लांगडे (19), व्यंकटेश सुरेंद्र स्वामी (25), आकाश गोपाल देवर (24), अमोल अशोक शिंदे (25), अनिकेत उमेश राचलवार (19, रा. खडकी बाजार), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अलीहुसेन शहा (29, रा. खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

खडकी बाजार परिसरात अलीहुसेन लिंबू सरबत विक्रीचा व्यवसाय करतात. 4 डिसेंबरला रात्री पावणेदहाच्या सुमारास ते हातगाडीसह घरी निघाले होते. त्यावेळी आलेल्या टोळक्याने त्यांना शस्त्राचा धाक दाखविला. अलीहुसेन यांच्याकडील दीड हजारांची रोकड हिसकावून घेतली. त्याशिवाय हातगाडीवरील साहित्याची तोडफोड करीत परिसरात आरडाओरड करीत दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी खडकी पोलिसांनी तातडीने टोळीला अटक केली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस उपनिरीक्षक मगदूम यांच्या पथकाने केली.