पुणे – जांभुळवाडी परिसरात सहा वर्षाच्या चिमुरड्याचा गळा आवळून खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील नवीन कात्रज बोगद्याजवळील जांभुळवाडी गावच्या हद्दीत मराठेशाही हॉटेलजवळ सहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी आढळून आला. त्याचा गळा आवळून खून करून मृतदेह महामार्गाच्या कडेला टाकून दिल्याचा उघडकीस आले आहे. आयान शेख (वय 6 ) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभुळवाडी गावच्या हद्दीत महामार्गाच्या कडेला एका मुलाचे मृतदेह नागरिकांना आढळला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता मुलाचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळी मुलाचे शोध घेत त्याचे काही नातेवाईक आले होते. त्यामुळे त्याची ओळख पटविण्यात यश आले आहे. त्याचा खून कोणी व का केला हे स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, पुरंदर तालुक्यातील खळद येथे सासवड ते जेजुरी जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूस हॉटेल सूर्याच्या विरुद्ध दिशेला 35 वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह मंगळवारी आढळून आला आहे. त्यानंतर नागरिकांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार सासवड पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. महिलेच्या गळ्यावर वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. महिलेची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी सासवड पोलिस अधिक तपास करत आहेत.