नवरीची वरात अन पोलिस ठाण्याच्या दारात, बोनेटवर बसून शुटिंग आले अंगलट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न महत्वाचा घटक असतो. त्यासाठी सध्याच्या काळात अनेकांकडून व्हिडीओ शुटिंग केले जाते. मात्र, कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत थेट मोटारीच्या बोनटवर बसून पुण्यातील दिवे घाटात व्हिडीओ चित्रीकरण करणे एका वाग्दत्त वधूला अंगलट आले आहे. धोकादायकपणे प्रवास करणे, मास्क न परिधान करणे, कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या नवरीविरूद्ध तिच्या लग्नादिवशीच लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय चालक, व्हिडीओग्राफरसह तिघेजण गोत्यात आले आहेत.

लॉकडाऊनमुळे अनेक जोडप्यांनी लग्नासाठी विविध पर्यायांचा अवलंब करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. मात्र, भोसरीतील एका नववधूने थेट जीपच्या बोनेटवर बसून दिवे घाटात व्हिडिओ चित्रीकरण केले. त्यावेळी तिच्यासोबत कुटूंबिय आणि चालकासह व्हिडिओग्राफरही होता. नियमावलीचे उल्लंघन करीत मोटारीच्या बोनटवर बसलेल्या वाग्दत्त वधूचा व्हिडीओ हायरल झाला होता. सासवडजवळील मंगल कार्यालयात संबंधित मुलीचा लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र, अतिउत्साहात नियम पायदळी तुडवत तिच्यासह कुटुंबीयांनी दिवे घाटातून जीवघेणा प्रवास केला. विनामास्क असलेल्या नवरीने बोनेटवर बसून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घातला. तिच्या कुटुंबीयांनी देखील याबाबत कोणतीही खबरदारी न घेता निष्काळजीपणा बाळगला होता. त्यामुळे याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी लग्नादिवशीच मुलीसह इतरांविरूद्ध गुन्हा दाखल केला.

”कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत नवरी मुलीसह इतरांनी आज दिवेघाटातून धोकादायकपणे प्रवास केला होता. त्यासंदर्भात घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ माहिती घेतली. त्यानंतर मुलीसह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ”- अमृता काटे, पोलीस उपनिरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे