
पावसामध्ये चमकलेल्या विजेच्या प्रकाशातून भारती विद्यापीठ पोलिसांनी महिलेच्या खुनाची उकल केली आहे. याप्रकरणी तब्बल 320 सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत. त्याने महिलेकडील ऐवज लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने आरडाओरडा केल्यामुळे आरोपीने महिलेच्या डोक्यात दगड मारून खून केल्याचे उघडकीस आले आहे. शाहरूख शकील मन्सूर (वय – 27, रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, पोलीस निरीक्षक राहुल कुमार खिलारे उपस्थित होते.
आंबेगाव बुद्रुक परिसरात 20 मे रोजी महिलेच्या डोक्यात मारहाण करून तिचा खून केल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक गुन्हे राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी यांनी खून झालेल्या महिलेची ओळख पटविली. तिचे नाव प्रीती वाखारे (वय – 35) असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पथकाने तिच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण तपासले. त्यानुसार कोल्हेवाडी ते नवले पुलापर्यंतचे 100 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, महिला दुचाकीवरून नवले पुलावर गेल्याचे दिसले.
दरम्यान, 20 मे रोजी मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील लाइट अपुरी असल्यामुळे तपासात अडथळा निर्माण झाला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची बारकाईने पाहणी केली असता, वीज चमकल्यामुळे झालेल्या प्रकाशात महिला रिक्षामध्ये बसताना दिसली.
तपास पथकाने रिक्षाच्या काळ्या रंगाच्या हूडवरून आरटीओकडून क्रमांक मिळविला. पुणे शहरामध्ये रजिस्टर असलेल्या 10 हजार 794 रिक्षांची माहिती प्राप्त केली. तब्बल एक हजार २०० रिक्षांवर वाहतूक विभागाकडून झालेल्या दंडात्मक कारवाईच्या चलनावरून रिक्षाचे दोन्ही बाजूंचे फोटो प्राप्त केले. 150 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे रिक्षाचा शोध घेतला. आरोपी शाहरूख मन्सूर याने खून केल्याचे उघडकीस आले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, राहुल शेडगे, नागेश पिसाळ, नरेंद्र महांगरे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, अवधूत जमदाडे, अभिनय चौधरी, तुकाराम सुतार, संदीप आगळे, सागर बोरगे, मितेश चोरमोले, किरण साबळे, नीलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांनी केली.



























































