माथाडीच्या नावे खंडणी उकळणारे तिघे जेरबंद, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी मागणार्‍या तिघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली. सव्वालाखांची मागणी करून 26 हजार घेताना तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले. विमाननगर भागात ही कारवाई करण्यात आली.

संकेत दिलीप गवळी (वय – 29, रा. विमाननगर), अरुण शंकर बोदडे (वय -48, रा. धानोरी रस्ता), नितीन एकनाथ कांबळे (रा. लोहगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

विमाननगर भागातील रो मॉलमधील साहित्य उचलण्याचे काम एका व्यावसायिकाकडे देण्यात आले होते. हे काम आमच्या माथाडी संघटनेकडून करण्यात येणार आहे, असे सांगून आरोपी गवळी, बोदडे, कांबळे यांनी व्यावसायिकाकडे खंडणी मागितली होती. मॉलमधील साहित्याची ने-आण करणार्‍या गाड्या आरोपींनी अडवून त्रास देत व्यावसायिकाकडे एक लाख 26 हजार रुपयांची मागणी केली. याबाबत खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार देण्यात आल्यानंतरपथकाने सापळा लावला. 26 हजार रुपये घेताना आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.