Pune crime पानटपरी चालकावर चाकूने वार, साडेतीन हजारांची रोकड चोरली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पानटपरी चालकावर चाकूने वार करून त्याच्याकडील साडेतीन हजारांची रोकड टोळक्याने चोरून नेली. ही घटना 4 डिसेंबरला रात्री साडे अकराच्या सुमारास कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरूणाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी तरूण पानटपरी चालक असून 4 डिसेंबरला टोळक्याने त्याला धमकाविले. त्याच्यावर चाकूने वार करीत गल्ल्यातील साडेतीन हजारांची रोकड चोरून नेली. गंभीर जखमी झालेल्या पानटपरी चालकाला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे तपास करीत आहेत.

कोथरूडमध्ये तरूणाला बेदम मारहाण

मित्रासोबत गप्पा मारत थांबलेल्या तरूणाला दोघांजणांनी बेदम मारहाण करीत जखमी केले. ही घटना 3 डिसेंबरला रात्री अकराच्या सुमारास कोथरूडमधील साईनाथ वसाहत परिसरात घडली. याप्रकरणी यश जगताप (वय – 18) याने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक फडतरे तपास करीत आहेत.

महिलेचे सव्वा लाखांचे गंठण चोरीला

रिक्षासह पीएमपीएल बसने प्रवास करणार्‍या महिलेकडील पर्समधील 1 लाख 35 हजारांचे सोन्याचे गंठाण चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना नुकतीच हडपसर-स्वारगेट, स्वारगेट- कात्रज परिसरात घडली आहे. याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला हडपसर परिसरात राहायला आहे. 22 ऑक्टोबरला त्यांनी हडपसर ते स्वारगेट रिक्षाने प्रवास केला. त्यानंतर स्वारगेट ते कात्रज पीएमपीएल बसप्रवास केला. प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या पर्समधील 1 लाख 35 हजारांचे सोन्याचे गंठण चोरून नेले. याप्रकरणी महिलेने उशीरा तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे. पोलीस अमलदार अभय झेंडे तपास करीत आहेत.