महिना उलटूनही बाळ बोठे फरारच, जरे कुटुंबीयांकडून कॅण्डल मार्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येला आज एक महिना पूर्ण झाला. मात्र, या हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे हा फरारच आहे. त्यामुळे रेखा जरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी नगरमध्ये आज कॅण्डल मार्च काढण्यात आला. जरे कुटुंबीयांसह अनेक सामाजिक संस्था या मार्चमध्ये सहभागी झाल्या होत्या.

30 नोव्हेंबरला रात्री 8 च्या सुमारास नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात रेखा जरे यांची निर्घृण हत्या करण्याची घटना घडली आहे. या घटनेला आज (30 डिसेंबर) एक महिना झाला आहे. या कॅण्डल मार्चमध्ये यशस्विनी महिला ब्रिगेडसह रामरहिम बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान, स्टुडंट पॉवर फाऊंडेशन, अहमदनगर संघर्ष समिती, जनआधार फाऊंडेशन, नगर सोशल क्लब, सकल मराठा समाज, राष्ट्रवादी काँग्रेस, फुले ब्रिगेड, नगर शहर काँग्रेस कमिटी, भिंगार शहर काँग्रेस कमिटी व टिपू सुलतान प्रतिष्ठान आदी संस्था व संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

बोठेला फरार घोषित करण्यासाठी पोलिसांची तयारी सुरू

रेखा जरे खून प्रकरणासंदर्भात फरार असलेला मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या निकटवर्तीयांची चौकशी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तसेच दोन ठिकाणी सर्च ऑपरेशनसुद्धा करण्यात आलेले आहे. त्याचा ठावठिकाणा लागला नसून, यात अनेकांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. बाळ बोठेला फरार घोषित करण्यासाठी स्टँडिंग ऑर्डरसाठी प्रक्रिया पूर्ण झाली असून, दोन दिवसांमध्ये तो अर्ज न्यायालयात सादर केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

…तर उच्च न्यायालयात दाद मागणार

नगर जिह्यात दरवर्षी खुनाच्या गंभीर घटना घडत आहेत. प्रत्येक वेळी तपास यंत्रणेला वेगवेगळे अनुभव येत आहेत. जरे हत्याकांड प्रकरणातील सूत्रधार पोलिसांना याच कारणातून सापडत नसावा. जरे हत्याकांड प्रकरणातील सूत्रधारास येत्या आठवडाभरात अटक न केल्यास सर्व महिला संघटनांना बरोबर घेऊन उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी दिला आहे.