
पूर्ववैमनस्यातून दोघांनी भावडांवर कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना शहरातील मध्यवर्ती गणेश पेठेत घडली. त्याशिवाय भांडणात मध्यस्थी करणाऱ्यालाही हाताने मारहाण केली आहे. तुषार कुंदुर (वय 18) आणि आशिष कुंदुर (वय 20 दोघेही रा. गणेश पेठ, मेनकर वाडा) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी तुषार कुंदुर यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास तुषार आणि त्यांचा मित्र गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तेथे आलेल्या आरोपीने तुषारला तुला जास्त माज आला आहे काय, आपण फिरायला गेलो होतो तेव्हा तुझ्या मित्रांनी भांडण सोडविले होते, आता तुझ्याकडे बघतोच, असे म्हणत लपविलेला कोयता काढून वार केला. त्यावेळी तुषारचा मोठा भाउ आशिषने मध्यस्थी केली असता, आरोपींनी त्याच्यावरही कोयत्याने वार केला. त्याशिवाय तुषारचा मित्र ऋतुराज मोरे वय 18 यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांना हाताने मारहाण केली. याप्र्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राहूल घाडगे तपास करीत आहेत.


























































