
सामना प्रतिनिधी । पुणे
बंगल्यात घुसून वृद्ध घरमालक आणि नोकरांना पिस्तुलाच्या धाकाने डांबून ठेवून तब्बल पाच लाखांचा ऐवज लुटून एक कोटीची खंडणी मागितल्याचा प्रकार घडला होता. मात्र, या वृद्धाच्या ३० वर्षांपासूनच्या विश्वासू कारचालकाच्या मुलानेच या दरोड्याचा कट रचल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी त्याच्यासह पाचजणांना गुन्हे शाखेने अटक केली.
दीपक शिवाजी मेदगे (वय ३८), किरण किशोर तावडे (वय ३६), पारस ठाकुर सोलंकी (वय २८), सचिन स्टॅनी डिसोझा (वय २८), गणेश जनार्धन गोरे (वय २४) या पाचजणांना अटक केली आहे. तर, अब्दुल हादी रिजवान उर्फ भाईजान सत्तार शेख, रवीशकुमार लक्ष्मणप्रसाद सोनी (सर्व रा. मुंबई) यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट-१चे पोलीस कर्मचारी योगेश जगताप, सुधीर माने यांनी ही कारवाई केली.
डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपटे रस्ता येथे सरोज सदन हा बंगला हंसराज भवानजी खेमका (वय ८४) यांचा आहे. त्यांची मेहुणी हेमा छेडा (वय ६४) या त्यांचा सांभाळ करतात. खेमका यांना हा बंगला विकायचा असल्याने ते अनेकदा पुण्यात येत असत. त्यावेळी त्यांचा ३० वर्षांपासूनचे चालक शिवाजी मेदगे हे सोबत असत. १६ जानेवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास चारजण त्यांच्या घरामध्ये पिस्तूल घेऊन घुसले. पिस्तुलाचा धाक दाखवून घरातील सोन्याचे व हिऱ्याचे दागिने व रोख असा पाच लाख ७० हजारांचा ऐवज लुटला होता. दरम्यान, त्यांना आणखी एक कोटी रुपये हवे असल्याने त्याची मागणी केली. हे पैसे मुंबईतून मिळणार असल्याने ते चालक शिवाजी मेदगे यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून मुंबईला घेऊन गेले. त्याच दरम्यान या बंगल्याचे दार कोणीतरी वाजविल्याने उर्वरित दोघे गॅलरीतून उड्या मारून पळून गेले होते. या गुन्ह्यात पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून शिवाजी मेदगे यांचा मुलगा दीपक याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर या संपूर्ण गुन्ह्याचा कट उघड झाला.
असा रचला दरोड्याचा कट
शिवाजी मेदगे हे खेमका यांच्याकडे खूप पैसा आहे. पुण्यातला बंगला विकायचा आहे. त्यामुळे आणखी पैसा आता मिळू शकतो, असे घरामध्ये बोलत असत. हे बोलणे ऐकून दीपक मेदगेने त्याचा मित्र किरण तावडे या गुन्हेगाराशी संपर्कसाधून कट रचला. १५ तारखेला शिवाजी मेदगे हे खेमका व इतरांना घेऊन पुण्यात आले. या दिवशी त्यांचा व्यवहार होणार आहे, त्यामुळे पैसे असतील, असे दीपकला वाटले होते. त्यामुळे त्याने १६ जानेवारीला घरात घुसून पैसे लुटण्याचा कट रचला. याच दिवशी पहाटे दीपकने या आरोपींना खेमका यांचा बंगला दाखविला. सकाळी साडेआठ वाजता चौघे तोंडाला रुमाल बांधून बंगल्यात घुसले. त्यावेळी दीपक हा बंगल्यापासून दूर आपटे रस्त्यावर कारमध्ये थांबला होता. बराच वेळ झाला तरी कोणीही आले नाही, त्यामुळे तो तेथून निघून गेला. मात्र, मुंबईतून एक कोटी रुपये घेण्यासाठी शिवाजी मेदगे यांना मुंबईला घेऊन गेले, याची माहिती त्याला त्याच्या साथीदारांनी दिली नव्हती, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्योतिप्रिया सिंह, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांनी सांगितले.


























































