
पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेचा तपास सुरू असताना पेन्सिलने लिहलेली सुसाईड नोट पोलिसांना आढळली आहे. आम्ही मर्जीने आत्महत्या करत आहोत, पोलिसांनी कुणाला त्रास देऊ नये असा मजकूर लिहून ठेवण्यात आला होता.
‘कृपया पोलिसांनी कोणालाही त्रास देऊ नये, आम्ही आमच्या मर्जीने परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करीत आहोत- त्याखाली पती – पत्नी ने सही केली आहे’, अशी माहिती पोलिसांनी दिली.
भारती विद्यापीठ परिसरात दोन चिमुकल्यांना गळफास दिल्यानंतर आई-वडिलांनी गळफास घेतला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचे या नोटमधून समोर आले आहे. यात 6 वर्षाच्या मुलाचा आणि 3 वर्षाच्या मुलीचा समावेश आहे.
अतुल दत्तात्रय शिंदे (वय 33), जया अतुल शिंदे (वय 32), ऋग्वेद अतुल शिंदे (वय 6) आणि अंतरा अतुल शिंदे (वय 3) अशी आत्महत्या केलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.



























































