
घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने कोंढव्यातील कुमार सुरक्षा इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सोमवारी सायंकाळी सहा वाजून 50 मिनीटांनी आग लागली. अग्निशमक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेउन दोन सिलेंडर बाहेर काढून आठ नागरिकांची सुरक्षितरित्या सुटका केली. जवानांनी सव्वा तासात आगीवर नियंत्रण मिळविले, अशी माहिती अग्निशमक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी दिली.
कोंढव्यात वेलकम हॉलमागे असलेल्या कुमार सुरक्षा इमारतीला सोमवारी संध्याकाळी सहा वाजून 50 मिनीटांनी आग लागल्याची माहिती अग्निशमक नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानुसार अग्निशमक जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी इमारतीच्या पाचव्या मजल्यातून धुर येत असल्याचे दिसून आले. त्यानुसार जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, सिलेंडरच्या स्फोटाने आग लागल्याचे दिसून आले. त्यानुसार जवानांनी घरातील दोन सिलेंडर बाहेर काढून आग विझविण्यास सुरुवात केली. त्यानंतर पाचव्या मजल्यावरील नागरिकांसह इमारतीच्या टेरेसवर असलेल्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. धुरामुळे परिसरात प्रचंड कोंदट वातावरण तयार झाले होते. अखेर सव्वा तासानंतर अग्निशमक जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर परिसरातील नागरिकांसह स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. ही कामगिरी स्टेशन अधिकारी समीर शेख यांच्या पथकाने बजावली.


























































