गे अ‍ॅपवरील चॅटिंग पडली महागात, विवाहित तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
gay-new

>> नवनाथ शिंदे

नागरिकांनो सावधान तुम्ही जर कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करुन वैयक्तिक माहिती शेअर करीत असल्यास ते धोकादायक ठरू शकते. अशीच एक भयंकर घटना धायरी परिसरात राहणाऱ्या एका तरुणासोबत घडली आहे. संबंधित तरुणाला गे चॅट अ‍ॅपवरील मैत्री 81 हजारांना पडली आहे. समलैंगिक संबंध करण्याच्या उद्देशाने अनोळखी ठिकाणी गेलेल्या तरुणाला तीन हल्लेखोरांनी खोलीमध्ये नेउन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्या तरुणाकडील सोन्या-चांदीच्या लॉकेटसह पेटीएमद्वारे त्याच्या खात्यातील रक्कमही लंपास केली. याप्रकरणी एका तरुणाने सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 34 वर्षीय तरुण धायरी परिसरातील रहिवाशी असून त्याचे लग्न झाले आहे. त्याने काही दिवसांपुर्वी गे चॅट अ‍ॅप डाउनलोड केले होते. 9 ऑगस्टला अ‍ॅपवर चॅट करताना एका रवी नावाच्या मुलाने फिर्यादी तरुणाला रिक्वेस्ट पाठविली होती. त्यानुसार त्यांचे चॅटिंग सुरु झाले होते. त्यांनी एका खोलीवर भेटून त्यांचे संबंध पुढे न्यायचे ठरवले. त्यानुसार रवीने फिर्यादी तरुणाला पत्ता देउन नांदेड फाटा परिसरातील एका खोलीवर बोलाविले. त्यानुसार फिर्यादी तरुण चव्हाणनगरमधील परिसरात गेला. त्याठिकाणी रवी आणि तरुणाच्या भेटीनंतर त्यांच्यात समलैंगिक संबंध प्रस्थापित करणार होते. तेवढ्यात तिघांनी खोलीमध्ये येऊन फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तलवारीचा धाक दाखवून त्याच्याकडील सोन्या-चांदीचे लॉकेट घेतले. पेटीएम आणि गुगलपेद्वारे मिळून 81 हजार लुटले.

नागरिकांनी अनावश्यक मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करण्याच्या मोहात पडू नये. त्याशिवाय अनोखळीची मैत्री, वैयक्तिक माहिती शेअर करु नये. गे अ‍ॅप चॅटवरील मैत्रीनंतर तिघांनी एकाला लुटले आहे. त्याप्रकरणाचा तपास प्राधान्याने करण्यात येत आहे. – सतीश उमरे, सहायक पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड