पुणे – घरात न घेतल्याच्या रागातून टोळक्याची कुटुंबीयांना मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरात न घेतल्याच्या रागातून सात ते आठ जणांच्या टोळक्याने मित्राला मारहाण करून त्यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. त्याशिवाय त्यांची पत्नी आणि मुलाला ढकलून दिले आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी रात्री नउच्या सुमारास पुण्यातील मार्केटयार्डमधील हाईट पार्क सोसायटीत घडली.

याप्रकरणी प्रसन्न मेहता (रा. हाईट पार्क, मार्केटयार्ड) यांच्यासह आठजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नरेंद्र सिसोदिया (वय 51) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र आणि प्रसन्न एकमेकांचे मित्र असून एकाच सोसायटीत राहायला आहेत. दोन दिवसांपूर्वी काही कारणामुळे नरेंद्र यांनी प्रसन्नला घरात घेतले नाही. त्याचा राग आल्यामुळे प्रसन्नने सात ते आठजणांच्या टोळक्याच्या मदतीने नरेंद्र यांना शिवीगाळ केली. त्यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. त्याशिवाय नरेंद्र यांच्या पत्नीसह मुलाला ढकलून दिले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम तपास करीत आहेत.